‘स्थानिक’च्या पार्श्वभूमीवर शरद पवार पुन्हा मैदानात; एकीकरण अनौपचारिक चर्चा? दिशा निवडणूक रणनितीसाठी ३ दिवस बैठका

0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. काही राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक बदल होताना पाहायला मिळत आहेत. तर काही बैठका घेऊन आगामी निवडणुकीसाठीची रणनीती आखत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील आता मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षाच्या मॅरेथॉन बैठका होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने येत्या २६, २७ आणि २८ मे रोजी सलग तीन दिवस महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठका मुंबईत होणार आहेत. येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सल्लामसलतीसाठी या बैठका घेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

या बैठकांचा मूळ उद्देश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर केंद्रीत असणार आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, ठाणे आणि इतर प्रमुख शहरांतील महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका आणि उमेदवारी ठरवण्यासाठी हा महत्वाचा टप्पा ठरणार आहे.

सध्या पक्षामध्ये दोन प्रवाह पाहायला मिळत आहेत. एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन लढाव्यात असं काही नेत्यांकडून मत व्यक्त करण्यात येत आहेत तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर बरोबर जाणं योग्य नसल्याचं काही नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोन्ही बाजू शरद पवार ऐकून घेणार असल्याचं बोललं जात आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

एकीकरणावर चर्चा होणार

२८ मे रोजी होणाऱ्या बैठकीला पक्षप्रमुख शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दिवशी होणाऱ्या चर्चेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. विशेषतः दोन राष्ट्रवादी काँग्रेस गट अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येऊ शकतात का, यावरही या बैठकीत अनौपचारिकरीत्या चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे २८ तारखेला होणारी बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या भविष्यातील दिशा आणि निवडणूक रणनिती यासाठी ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा