पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील 26 निष्पाप नागरिकांच्या हत्येचा बदला भारताने घेतला आहे. पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत भारताने पाकिस्तानला अद्दल घडवली आहे.या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया आली असून त्यांनी मोठे संकेत दिले आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याचा मध्यरात्री भारतीय लष्कराने बदला घेतला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांची 9 ठिकाणे हवाई दलाच्या राफेल विमानांनी उध्वस्त केली.
‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यानंतर जगभरातील भारतीयांसह इतर काही देशांनीही भारतीय लष्करावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सोशल मीडियात पोस्ट करत आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
शहांनी ट्विटवर पोस्ट करत म्हटले आहे की, आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि येथील नागरिकांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे.
शहांनी ट्विटरमध्ये सूचक विधान करताना भारत आणखी मोठी कारवाई करू शकते असेही संकेत दिले आहेत. दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी भारताने दृढनिश्चय केल्याचे शहांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनीही ‘पिक्चर अभी बाकी है’ असे ट्विट करत भारताकडून पुन्हा हल्ला केला जाऊ शकतो, असे सूचक संकेत दिले आहेत.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान अद्द्ल घडविणार असल्याचे स्पष्ट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील कार्यक्रमात याबाबत जाहीरपणे भाष्य केले होते. त्यानंतर शहांसह केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही करारा जवाब दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार मध्यरात्री एअर स्ट्राईकच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला धडा शिकवला आहे.