गेल्या काही दिवसांपासून पुणे मनपा प्रभाग १० मधील कोथरूड तसेच बावधन खुर्द आणि बावधन बुद्रुक मधील इकेनो मिडोरी, डॅफोडील तसेच आमची कॉलनी, भुसारी कॉलनी आणि परिसरातील अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंबंधी समस्याना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने तसेच प्रशासनामार्फत पाणी पुरवठ्याच्या वेळेमध्ये कोणत्याही प्रकारे कपात करण्यात आलेली नसताना देखील वेळे अगोदर पाणी बंद करण्यात येते. चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीमधून पाण्याची पातळी व्यवस्थितपणे भरण्या अगोदर पाणी सोडण्यात येत आहे. होत असलेल्या या गैरप्रकारामुळे पाण्याबाबत नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. पूर्वीपेक्षा सध्याची पाणी पुरवठ्या बाबत असणारी स्थिती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या मार्फत देण्यात आली.






या सर्व समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठी मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी पाणी पुरवठा विभागाचे मा. श्रीधर कामत साहेब, कार्यकारी अभियंता, मा.योगेश देवकर साहेब, उप अभियंता,आणि मा. नरेंद्र परदेशी कनिष्ठ अभियंता तसेच परिसरातील नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. सध्याचा पाणी प्रश्न पुढील २ ते ३ दिवसात सोडविण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे मा. श्रीधर कामत साहेब, कार्यकारी अभियंता यांनी दिली.
तरी सदर पाणी प्रश्नावर त्वरित उपाययोजना न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचे निवेदन स्वरूपी पत्र मा. श्री. विक्रम कुमार साहेब, आयुक्त, पुणे मनपा आणि मा. श्री. अनिरुद्ध पावसकर साहेब, मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभाग यांना प्रत्यक्ष भेटून दिले.











