नवी मुंबई दि. १९ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४९ संलग्न माता रमाई महिला मंडळ, तक्षशिला तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव अर्थात भीमजयंती महोत्सव तक्षशिला बुद्ध विहार, खांदा कॉलनी येथे शाखा अध्यक्ष नथुराम साखरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात प्रथम पंचशील ध्वजारोहण व ध्वजावंदन करून शांतता व संदेश रॅली काढण्यात आली तद्नंतर ही रॅली पुन्हा तक्षशिला बुद्ध विहार याठिकाणी येऊन मधाळ, सुमधुर व सुवाच्य रसाळवाणीने धार्मिक बुद्धवंदना पूजापठण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. तद्नंतर माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा आयुष्यमती पुष्पा जाधव यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितीतांचे स्वागत केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या, अभिजीत जाधव यांनी लाघवी व प्रभावी भाषाशैलीत सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे मन जिंकून घेतली.
सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित बौद्धजन पंचायत समितीचे कोषाध्यक्ष व विभाग क्र. ५६, कामोठेचे विभाग प्रतिनिधी नागसेन गमरे यांनी बाबासाहेबांच्या अथांग कार्याचा आढावा घेत शुभेच्छापर विचार व्यक्त केले त्यासोबतच प्रवचनकार, बौद्धाचार्य सुगंध कदम यांनीही बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर व त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकत प्रबोधन केले, शाखेचे माजी चिटणीस अंकुश मोहिते यांनी ही शुभेच्छापर विचार व्यक्त करत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व लोकप्रिय नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनीही उपस्थिती लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. शांतता, सहिष्णुतेच्या मार्गाने सदर भीम जयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
सरतेशेवटी सदर जयंती सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक मेहनत घेणाऱ्या उपाध्यक्ष भगवान विठ्ठल कांबळे, उपसचिव प्रशांत शिवराम गमरे, खजिनदार जिनावस रावजी कदम, संदेश वाहक विक्रम शिवराम गमरे, माता रमाई महिला मंडळ उपाध्यक्षा स्वाती सिद्धार्थ गमरे, सचिवा स्मिता संजय कदम, उपसचिवा सीता सुनील जाधव, कोषाध्यक्षा सुवर्णा नथुराम साखरे, संदेशवाहिका अश्विनी अशोक जाधव व कार्यकर्त्यांचे आभार मानून अध्यक्ष नथुराम साखरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.