पुणे शहर आणि जिल्ह्यात यंदा उन्हाच्या तीव्र झळा सध्या जाणवत आहेत. आजच्या तापमानाच्या नोंदींनी तर पुणेकरांची नक्कीच झोप उडणार आहे. कारण पुण्यातील तापमानानं चक्क सर्वाधिक तापमान असलेल्या विदर्भालाही मागं टाकलं आहे. पुण्यातील लोहगावात सर्वाधीक तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात उन्हामुळं लाही लाही होत आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान विदर्भातील अकोला जिल्ह्यात नोंदवण्यात आलं आहे. यामध्ये अकोल्यात ४३.७ अंश तापमानाची नोंद झाली. तर ब्रह्मपुरी, चंद्रपूरमध्ये ४२.४, यवतमाळमध्ये ४२.२, वाशिममध्ये ४१ अंश तर नागपूरमध्ये ४० अंश तापमानाची नोंद झाली आहे.
तसंच मराठवाड्यात सर्वाधिक तापमानाची नोंद बीडमध्ये झाली आहे. त्यानुसार, बीडमध्ये ४२.४ अंश डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तर परभणीत ४१.५, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव तसंच पश्मिच महाराष्ट्रातील सांगली, सातारा इथं पारा ४० अंशाच्यावर पोहोचला आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्राचा विचार करता पुण्यातील लोहगावमध्ये ४३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. हे पुणे जिल्ह्यताली आत्तापर्यंतच सर्वाधिक तापमान आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पुण्यातील या तापमानाच्या नोंदीनं मागे टाकलं आहे. त्यामुळं पुणेकरांसाठी ही नक्कीच चिंतेची बाब आहे.