केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना महायुतीतील धुसपुस समोर आल्याचे बोलले जात आहे. अमित शाह यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याची जबाबदारी असलेल्या अजित पवारांची तक्रार केल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत बोलताना भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खळखळ आहे. आणि याचा अर्थ ते जिवंत आहेत असं म्हणत अप्रत्यक्षरित्या महायुतीमध्ये धुसफूस असल्याचं मान्य केल्याचं बोललं जात आहे.






माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याची तक्रार अमित शाह यांच्याकडे केली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, माध्यमांना स्टोरिज तयार करायचे असतात आणि त्यामुळेच अशा गोष्टी समोर येतात. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नाही. महायुतीमध्ये सारं काही अलबेल आहे. सर्व गोष्टी समन्वयाने सुरू आहेत.
एका रक्ताची चार माणसं घरामध्ये असतात तिथेही भांड्याला भांडं लागतं. सरकारमध्ये तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. आणि अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक जेव्हा एकत्र येतात. अशा परिस्थितीत खळखळ नाही झाली तर माणसं हलवून पहावी लागतील की जिवंत आहेत की गेली आहेत. खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत. खळखळ आहे याचा अर्थ ते व्यक्त होत आहेत. त्यामुळे खळखळ व्यक्त करायची असते जर ती व्यक्त केली नाही तर माणसं आजारी पडतात असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री राज्यातील सामाजिक विषयांवर बोलत नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 137 जागा मिळाल्या असून महायुती म्हणून 235 आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून निवडला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं सर्वमान्य नेतृत्व सध्या महाराष्ट्रात आहे.
2014 ते 2019 दरम्यान ते मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण आणि सुविधा या एकमेकात अडकल्या होत्या त्या वेगळ्या केल्या. आरक्षण नसेल तरीदेखील सुविधा त्यांनी दिल्या तसेच नंतर, मराठा समाजाला आरक्षण ही दिलं आणि ते हायकोर्टात टिकून दाखवलं. त्यामुळे बहुजन समाज त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. संजय राऊत यांच्या मनात फक्त देवेंद्र फडणवीस विरुद्ध फुले, आंबेडकर वाद आहे.
मराठा नेते हे राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही मात्र ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलं. त्यामुळे बहुजन समाज देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल हे जे राऊत यांच्या मनात आहे. ते कधीच पूर्ण होणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले.











