विठूरायाचं दर्शन घेऊन घरी परतताना रस्त्यावरच झाडल्या गोळ्या; पूर्ववैमनस्यातून पती-पत्नीवर गोळीबार, रस्त्यावर जागोजागी जिवंत काडतुसे, रोपळे येवती मार्गावरती थरार

0

मोहोळ तालुक्यात पूर्ववैमनस्यातून पती-पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना (मंगळवार ता. 8 एप्रिल) घडली आहे. महिलेवरती रूग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावरती हा गोळीबारचा थरार घडला, या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. शिवाजी पुंडलिक जाधव, सुरेखा शिवाजी जाधव या पती-पत्नीवर पिस्तूल मधून गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाजी जाधव यांना एक गोळी तर सुरेखा जाधव यांना तीन गोळ्या लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी दशरथ केरू गायकवाड या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

नेमकं काय प्रकरण?

चार वर्षांपूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून दशरथ गायकवाड याला मारहाण झाली होती, चार वर्षे जुन्या वादातून दशरथ याने पती-पत्नीवर गोळीबार केल्याचा संशय आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत आरोपीचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. दरम्यान, गोळीबार करून दशरथ केराप्पा गायकवाड हा संशयित फरार असून त्याच्या शोधासाठी एक अधिकारी व 10 कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेडगे यांना तपासाबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी जाधव व सुरेखा जाधव हे पती-पत्नी मंगळवारी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून येवतीकडे परत येत असताना येवती- रोपळे रस्त्यावर दशरथ गायकवाड याने त्या पती-पत्नीवर गोळ्या झाडल्या. त्यात ते दोघेही जखमी झाले. दोघांनाही तातडीने पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सुरेखा गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार झालेल्या ठिकाणी येवती रोपळे रस्त्यावर जागोजागी जिवंत काडतुसे व दोन मॅक्झिन पोलिसांना सापडले आहेत.

दरम्यान घटना स्थळावर ठसे तज्ञांना पोलिसांनी पाचारण केले होते. घटना स्थळावर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, एलसीबी चे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पंढरपूरचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर मोहोळ व पंढरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. उशिरा पर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन