बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या पाच गोपनीय साक्षीदारांचे जवाब महत्त्वाचे ठरले. ते जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले आहेत. ज्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचा कट कसा कुठे आणि कधी रचला हे स्पष्ट झालंय.. संतोष देशमुख हत्या प्रकरणात हा जबाब मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे.गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार हत्येच्या एक दिवस अगोदर विष्णू चाटेने तिरंगा हॉटेलवर सुदर्शन घुलेची चांगलीच शाळा घेतली होती. स्वतःची इज्जत घालवलीस व आमची पण घालवलीस, असे म्हणत संताप व्यक्त केला. ही बाब चार्जशीटमधून समोर आली आहे.
आवादा कंपनीच्या बाहेर सरपंच संतोष देशमुख यांनी मस्साजोगकर ग्रामस्थांच्या मदतीने सुदर्शन घुलेला हाकलून दिले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे वाल्मिक कराडच्या गँगला त्यांच्या टोळीची दहशत कमी होण्याची भीती वाटत होती. आज एकाने केले उद्या कोणी टोळीतील सदस्यांना घाबरणार नाही, त्यामुळे विष्णू चाटेने घडलेला प्रकाराबद्दल सुदर्शन घुलेला भेटण्यासाठी बोलवले आणि त्याची कानउघडणी केली.
नेमका विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेमध्ये काय संवाद झाला?
विष्णू चाटे : आम्ही कमवायचे आणि तुम्ही वाटोळे करायचे, स्वतःची इज्जत घालवलीस व आमची पण घालवलीस… तुला प्लान्ट बंद करायला पाठवले होते, तो तुम्ही बंद केला नाही, उलट हात हालवत परत आला.
सुदर्शन घुले : आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो. तेथे संतोष देशमुख आला व त्याने आम्हास कंपनी बंद करु दिली नाही तसेच मस्साजोगच्या गावातील लोकांनी आम्हाला हाकलून लावलं.
विष्णू चाटे: वाल्मीक अण्णांचा निरोप आहे की, कामही बंद केले नाही. खंडणीही दिली नाही. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. इतरांना संदेश जाईल की, आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतात. वाल्मिक अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा.
तिरंगा हॉटेलमध्ये झाली होती भेट
8 डिसेंबरला सायंकाळी 7 ते 8 च्या सुमारास विष्णु चाटे आणि सुदर्शन घुलेची भेट नांदुर फाटा येथे तिरंगा हॉटेलमध्ये येथे झाली होती.