ज्या घरात राहत नाही, त्याचं लाख रुपयांचं वीज बिल; कंगना राणौतला मोठा झटका

0
2

अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या खासदार कंगना राणौत यांना वीज बिलाचा मोठा झटका लागला आहे. याविरोधात त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील हिमाचल प्रदेश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कंगना यांच्या मनालीमधल्या घराचं वीज बिल तब्बल एक लाख रुपये आल्याचा आरोप आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी इथं नुकत्याच झालेल्या एका राजकीय कार्यक्रमादरम्यान कंगना यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. कंगना यांचं मुंबईशिवाय मनालीमध्येही एक घर आहे. याचं घराचं वीज बिल लाख रुपये झाल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे त्या घरात कंगना क्वचितच कधीतरी राहतात.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

कंगना यांनी मंडीमधल्या एका राजकीय कार्यक्रमाला नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी हिमाचल प्रदेशच्या सरकारवर टीका करत म्हटलं की, शहराची अत्यंत दुर्दशा झाली आहे. “या महिन्यात माझ्या मनालीमधल्या घराचं वीज बिल एक लाख रुपये आलं आहे, जिथे मी राहतसुद्धा नाही. इतकी या शहराची अवस्था झाली आहे. आपण वाचतो आणि लाज वाटते की हे काय होतंय”, असं त्यांनी भाषणात म्हटलंय. यावेळी त्या पुढे म्हणाल्या, “परंतु आपल्याकडे एक संधी आहे. तुम्ही सर्वजण जे मला माझ्या भावाबहिणींसारखे आहेत, तुम्ही ग्राऊंड लेव्हलला इतकं काम करता. हे आपल्या सर्वांचं दायित्व आहे की आपल्याला या देशाला, या प्रदेशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जायचंय. मी तर म्हणेन की हे सर्वजण लांडगे आहेत आणि आपल्याला त्यांच्या तावडीतून बाहेर पडायचं आहे.”

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

कंगना यांनी 2024 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि तिथे त्यांचा विजय झाला होता. कंगना यांनी भाजपकडून ही निवडणूक लढवली होती. कंगना यांच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्या आर. माधवनसोबत एका सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.