प्रशांत कोरटकरने ‘त्या’ ५ जणांची अडचण वाढवली, पोलिसांना नावं सांगितली, समोरासमोर चौकशीही होणार!

0
4

प्रशांत कोरटकर याच्या कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ झालीय.कोरटकर याला मदत करणाऱ्यांना पोलिसांनी टार्गेट करत एक गाडीही जप्त केलीय. एका बाजूला पोलिसांची तपासात प्रगती सुरू असताना दुसऱ्या बाजूला शिवप्रेमींच्या रोषाचा सामनाही कोरटकरला करावा लागत आहे. प्रशांत कोरटकर याची तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पुन्हा दोन दिवसांची कोठडी सुनावली. त्यामुळे कोरटकर याचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे.

दरम्यान कोरटकर विरोधातला रोष आजही पाहायला मिळाला असून कोर्टाच्या इमारतीतच एका वकिलाने त्याच्या विरोधात हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.आज झालेल्या सुनावणीत पोलिसांनी कोरटकरला फरार काळात मदत करणाऱ्या मित्रांची यादीच न्यायालयाला दिली त्यामुळे त्याच्या मित्रांच्या अडचणीत वाढ झालीय.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

कोण आहेत कोरटकरला मदत केलेले त्याचे मित्र?

नागपूरचा प्रशिक पडवेकर

चंद्रपुरचा धीरज चौधरी

इंदोरचा हिफाज अली आणि राजेंद्र जोशी

तेलंगणा मधील करिमनगरचा साईराज शेटकर

अशा पाच मित्रांनी फरार काळात कोरटकरला मदत केली. या मित्रांच्या मदतीने कोरटकर इंदोर, सिकंदराबाद, हैदराबाद आणि तेलंगणामध्ये फिरत होता. यावेळी तो धीरज चौधरी याची MH 34 CD 7720 ही कार वापरत होता. त्यामुळे पोलिसांनी ही कार आता जप्त केलीय. दरम्यान इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधान व्यक्त केलंय.

दरम्यान पोलिसांनी केलेल्या मागणीवरून न्यायालयाने दोन दिवसांची आणखी कोठडी वाढवून दिली आहे.या दरम्यान कोरटकर आणि त्याच्या मित्रांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. तर तो राहत असलेल्या हॉटेलमधील माहिती आणि त्याला आर्थिक रसद कोणी पुरवली याची माहिती पोलीस संकलित करणार आहे. त्यामुळे कोरटकर तर अडचणीत आलाय मात्र त्याच्या मित्रांच्या अडचणीही आता वाढल्या आहेत.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?