मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं तयार केल्यामुळे वादात सापडलेला कॉमेडियन कुणाल कामरा अखेर पोलीस चौकशीला सामोरं जाणार आहे. कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलं होतं. मुंबई पोलिसांनी कुणालला 31 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचं दुसरं समन्स बजावलं होतं. या समन्सला कुणालने प्रतिसाद दिला आहे. कुणाल 31 मार्चच्या पोलीस चौकशीला सामोरं जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. मद्रास हायकोर्टाकडून कुणाल कामराला अटकपूर्व जामिनासाठी अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता कुणाल कामरा पोलीस चौकशीला सामोरं जाणार आहे.
मुंबईत सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि पोलिसांची कारवाई पाहता कुणाल कामरा याने मद्रास हायकोर्टात धाव घेतली. कुणाल कामरा याने अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी त्याने मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली. त्याच्याकडून आज सकाळीच अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर लगेच दुपारी त्याच्या अर्जावर सुनावणी पार पडली.
कोर्टात कुणालचा दावा काय?
“मी मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे. मी 2021 पासून तामिळनाडूतच राहत आहे. पण मुंबई पोलिसांकडून अटकेची शक्यता असल्याने आपल्याला अटकपूर्व जामीन हवा”, अशी मागणी कुणाल कामराने आपल्या याचिकेत केली होती. तसेच त्याच्या वकिलांनी कोर्टातदेखील तसाच युक्तिवाद केला. कोर्टाने त्याची संपूर्ण बाजू ऐकून घेतली.
मद्रास कोर्टाचा दिलासा
सुनावणीअंती मद्रास हायकोर्टाने कुणाल कामरा याला अंतरिम दिलासा दिला आहे. कुणालला 7 एप्रिलपर्यंत अटक करु नये, असे आदेश मद्रास हायकोर्टाने दिले. हे आदेश 7 एप्रिलपर्यंतच लागू असतील. या दरम्यान कुणाल कामरा याने मुंबईत जातीने हजर राहून तिथल्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करावा, असं देखील मद्रास हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
कुणाल 31 मार्चला पोलीस चौकशीला सामोरं जाणार
कुणाल कामरा येत्या 31 मार्चला मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाणार, असं कुणालच्या वकिलांनी मद्रास हायकोर्टात आश्वासन दिलं. तसेच कुणाल मुंबईत जामीन अर्जासाठी रितसर याचिका दाखल करेल, अशी देखील माहिती कुणालच्या वकिलांनी केली. दरम्यान, कुणालच्या विरोधात मुंबईत खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कुणालची 31 मार्चला चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर काय कारवाई होणार? ते पाहणं महत्त्वाचं आहे.