‘संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल’ इतिहासातील दाखले देत संविधानावरुन काँग्रेस लक्ष्य; फडणवीसांचा विधानसभेत घणाघात

0
1

मुंबई : ‘आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान गोठवण्यात आले. ४२व्या घटनादुरुतीमुळे राष्ट्रपतींना बाहुले बनवण्यात आले होते. काँग्रेसने संविधानाची अशी वारंवार पायमल्ली केली’, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केला.

‘भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर विधानसभेत दोन दिवस झालेल्या चर्चेचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाने झाला. या चर्चेत सहभागी होताना काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे (शरद पवार) जयंत पाटील आदींनी संविधानातील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे दाखले देत केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली होती. त्यास उत्तर देताना फडणवीस यांनी १९६७ ते १९७७ या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या घटनांचा दाखला देत तत्कालीन काँग्रेस नेतृत्वच संविधानाचे मारेकरी होते, असा आरोप केला. ‘देशाचे संविधान अनेक संकटांतून तावून-सुलाखून निघाले असून, ते परिपक्व झाले आहे. हे अतिशय सुंदर, समन्यायी आणि प्रत्येकाच्या स्वप्नाला पंख देणारे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. प्रत्येक भारतीयाच्या विकासाचे ते अस्र आहे’, असे गौरवोद्गार फडणवीस यांनी विधानसभेत काढले.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

‘देशाच्या सर्व संस्थांना कलंकित करायचे, त्यांच्यावर बोटे उचलायची, त्या संस्थांना एकप्रकारे अराजकाकडे न्यायचे, असे प्रकार सुरू आहेत. या संस्थांची बदनाम केली जाते तेव्हा आपण संविधानावर अविश्वास दाखवतो. कारण या संविधानाने या संस्था निर्माण केल्या आहेत. या संस्था इतक्या भक्कम आहेत की, त्या कोणीही तोडू शकणार नाही. त्यामुळे संविधानाने तयार केलेल्या संस्थांचे काहीच वाईट होऊ शकणार नाही’, असे फडणवीस म्हणाले.

‘२४ व्या आणि २६ व्या घटनादुरुस्तीने सर्व अधिकार संसदेकडे घेतले गेले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ते रद्दबातल करताना घटनेच्या मूलभूत चौकटीला हात घालण्याचा कुणालाही अधिकार नाही, असे स्पष्ट जॉर्ज फर्नांडिस यांच्या कुटुंबीयांसोबत जे काही झाले ते आठवले तरी आजही माझ्या डोळ्यांत पाणी येते, अंगावर काटे येतात. विरोधी पक्षातील एक लाखांहून अधिक लोकांना तुरुंगात टाकले होते. माझे वडील दोन वर्षे तुरुंगात होते. काकी शोभाताई फडणवीस तुरुंगात होत्या. डॉ. बाबासाहेबांचे संविधान गोठवून तुम्ही अख्खा विरोधी पक्ष तुरुंगात टाकायचे ठरवले होते,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारचे वाभाडे काढले. ४२व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून छोटी राज्यघटना तयार करण्यात आली. त्या वेळी राज्यघटनेत ९९ बदल करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ राज्यघटनेत सार्वभौम गणराज्य असा उल्लेख असताना त्यात समाजवादी, धर्मनिरपेक्षता हे शब्द घालण्यात आले, याकडे लक्ष वेधताना फडणवीस यांनी मूळ राज्यघटनेचा आत्मा हा धर्मनिरपेक्ष असाच आहे, हे डॉ. आंबेडकरांना माहिती होते, असेही ठामपणे सांगितले.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

‘राष्ट्रपती, राज्यपालांना अधिकार देण्यात आलेले आहेत. एखादा निर्णय ते रद्दबादल करू शकतात; परंतु ४२व्या घटनादुरुस्तीनंतर राष्ट्रपती केवळ बाहुले बनले होते. त्यांच्याकडे निर्णय पाठवला तर तो सही करूनच त्यांनी पाठवला पाहिजे, अशी व्यवस्था घटनादुरुस्तीने केली होती,’ असा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या आधी आमदार जयंत पाटील यांनी राज्यघटनेवर भाषण केले. या वेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षांच्या आमदारांना बोलण्यास कमी वेळ देत असल्याचा आरोप केला होता. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पाटील यांच्या आधी बोललेल्या विरोधी पक्षांच्या आमदारांच्या भाषणाची वेळ सांगितली.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

‘बाबासाहेबांचे स्वप्न मोदींकडून पूर्ण’मुख्यमंत्री फडणवीस यांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७०चा उल्लेख केला. पंडित नेहरू यांनी कलम ३७०चा आग्रह धरला होता. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांनी या कलमाचा मसुदा करण्यास नकार दिला होता. रस्ते आपल्याकडून बांधून घ्यायचे, अन्नधान्य आपल्याकडून घ्यायचे आणि स्वतःची राज्यघटना राखायची हे आपल्याला मान्य नाही, अशी भूमिका डॉ. आंबेडकर यांनी घेतली होती. मात्र, त्यांच्यावर फारच दबाव आल्यानंतर त्यांनी शेवटी हे कलम कायमचे नव्हे; तर तात्पुरते असेल या अटीवर घटनेत कलम ३७०चा समावेश करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कलम हटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार केले, असे फडणवीस यांनी सांगितले.