एकउपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये भेट झाली. वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय.






संजय राऊत म्हणाले की, त्यांचे उत्तम चाललेले असते. शिवसेनेतून आमचे जे काही लोक सोडून गेले आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या नाही तर आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही त्यांच्या आसपासही जाणार नाही. पण यांचे बरे असते, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट असते, एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, त्यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. आमच्याकडे असे काहीही नाही. त्यामुळे आमच्या काही भेटीगाठी कुणाशी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी देखील आम्ही टाळतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
आम्ही भांडत राहू, लढत राहू आणि धडा शिकवू
संजय राऊत पुढे म्हणाले की, राजकारणामध्ये संवाद ठेवला पाहिजे वगैरे या गोष्टींवर आमचा विश्वास नाही. ज्यांनी आमचा पक्ष तोडला, महाराष्ट्राशी बेईमानी केली, महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राच्या शत्रूसमोर गुडघे टेकले त्यांना आम्ही आमच्याकडे कितीही संधी असली तरी त्यांच्याशी संवाद ठेवणार नाही. मात्र, यांच्याकडे भेटीसाठी एक कारण असते, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक होते, नका जाऊ. विद्या प्रतिष्ठानमध्ये शैक्षणिक कामासाठी बैठकी होतात, रयत शिक्षण संस्थेची बैठक होते, या चांगल्या संस्था आहेत. आमच्याकडे काही अशा संस्था नाहीत. आम्ही रस्त्यावरचे फटके लोक आहोत. आम्ही भांडत राहू, लढत राहू आणि धडा शिकवू, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केलाय.












