राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यातच विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. विधान परिषदेतील या पाच जागांसाठी जोरदार रस्सीखेच होईल, असे वाटत असताना ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे या निवडणुकीसाठीचा घोडेबाजार टाळण्यात सत्ताधारी महायुतीला यश आले. यामध्ये भाजपच्या वाट्याला तीन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली आहे. त्यातच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेवर संजय खोडके हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या नावे एका अनोख्या विक्रमाची नोंद होणार आहे.
विधानपरिषदेतील भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाडवी हे विधानसभेवर निवडून गेल्याने यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडील एकाच जागेसाठी जवळपास 100 जण इच्छुक होते. तर शिंदेंच्या शिवसेनेकडील एका जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. तर भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या तीन जागासाठी अनेकजण इच्छुक असल्याने छाननी करून 20 जणांच्या नावाची यादी दिल्लीतील हायकमांडकडे पाठविण्यात आली होती.
चारजण झाले पहिल्यांदाच आमदार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच जणच रिंगणात राहिल्याने भाजपचे दादाराव केचे, संदीप जोशी, संजय केणेकर, शिंदेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे या पाच पैकी दादाराव केचे वगळता चार जणही पहिल्यांदा आमदार झाले आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय खोडके हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या नावे एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी पती-पत्नी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सदस्य असणार आहेत. अमरावती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुलभा खोडके या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत. तर त्यांचे पती संजय खोडके हे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आहेत.
स्वीय सहाय्यक ते आमदार अशी आहे कारकीर्द
संजय खोडके यांनी २००० मध्ये तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले होते. अभ्यासू वृत्ती आणि संघटनात्मक कौशल्यानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अमरावती शहरात पक्षविस्तार केला. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला दोनवेळा अमरावतीचे महापौर पद मिळाले. त्यामुळे त्यांना अजित पवार यांनी पहिल्यांदाच आमदारकी दिली आहे.
काँग्रेसने निलंबित केल्याने राष्ट्र्वादीत केला प्रवेश
अमरावतीमधील बडनेरा मतदारसंघातून २००४ मध्ये सुलभा खोडके या प्रथम निवडून आल्या होत्या. 2009 आणि 2014 मध्ये त्यांचा रवी राणाकडून त्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. 2024 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या काँग्रेस पक्षात होत्या. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने त्यांचे सहा वर्षासाठी निलंबन केले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्या अमरावती विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी झाल्या आहेत.
साडेचार वर्ष करता येणार एकत्रित काम
राज्याच्या विधिमंडळाचा आजपर्यंतचा इतिहास पहिला तर पती-पत्नी कधीच आमदार म्हणून एकत्रीत सभागृहात पहावयास मिळाले नव्हते. आता प्रथमच खोडके पती-पत्नी सभागृहात पुढील साडेचार वर्ष एकत्रित पाहवयास मिळणार आहेत.
पती-पत्नी आमदार पण विधीमंडळात एकत्रित नव्हते
यापूर्वीचा विधिमंडळाचा इतिहास पाहिला तर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व त्यांच्या पत्नी शालिनी पाटील हे दोघेजण पण आमदार राहिले आहेत. मात्र, ते दोघेजण वेगवेगळ्या काळात आमदार असल्याने विधिमंडळात एकत्रित काम केले नाही. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण हे दोघेही वेगवेगळ्या टर्ममध्ये आमदार होते. त्यासोबतच कन्नड मतदारसंघातील माजी आमदार रायभान जाधव त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव तर हर्षवर्धन जाधव व त्यांच्या पत्नी संजना जाधव हे पती-पत्नी वेगवेळ्या टर्ममध्ये आमदार राहिले आहेत.
दौड मतदारसंघातून सुभाष कुल यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रंजना कुल आमदार होत्या. माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर पत्नी सुमन पाटील या आमदार झाल्या होत्या. पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघातून राजीव राजळे व त्यांच्या पत्नी मोनिका राजळे हे वेगवेगळ्या टर्ममध्ये आमदार राहिले आहेत.