पुण्यातील हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला बुधवारी आग लागल्याची घटना घडली. यात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. सुरुवातीला शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यानंतर हे जळीतकांड बसचालकानेच घडवून आणल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी चालक जनार्दन हुंबर्डीकरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
एकीकडे ५७ वर्षीय बसचालकावर जळीतकांडाचा आरोप होत असताना, या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. जनार्दन हुंबर्डीकरला नाहक गोवलं जात असल्याचा आरोप त्याच्या पत्नी आणि भावाने केला आहे. त्यांनी पोलिसांच्या तपासावर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. हुंबर्डीकर पूर्णपणे शुद्धीत नसताना पोलिसांनी त्यांचा जबाब कसा नोंदवला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शिवाय ज्या बसला आग लागली, त्यात आरोपी जनार्दनचे सख्खे भाऊजी देखील होते, असं असताना जनार्दनने रिस्क कशी घेतली? असा सवालही कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. न्यूज १८ लोकमतशी संवाद साधताना जनार्दन हुंबर्डीकरच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, आरोपी जनार्दन हुंबर्डीकर हे पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवलाच कसा? ज्या बसला आग लागली, त्यामध्ये आरोपी जनार्दनचे सख्खे भाऊजी देखील होते. त्यामुळे ते आग कशी लावतील?
तसेच घटनेत वाचल्यांपैकी काहीजणांना खरचटले देखील नाही, त्यामुळे पेटत्या बसमधून ते सुखरूप बाहेर कसे पडले? आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावली असेल, तर त्यासाठी वापरलेलं केमिकल आणताना त्यांना कंपनीतील कुणीच का रोखले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करत हुंबर्डीकरच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.