उसाच्या एफआरपीबाबत न्यायालयाचा सरकारला झटका! दिला मोठा निर्णय

0

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. राज्य सरकारने घेतलेला एफआरपी (रास्त व उचित दर) दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला असून शेतकऱ्यांना आता साखर कारखान्याकडून एकरकमी एफआरपी मिळणार आहे. शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी घेत सरकारच्या आदेशाला धक्का दिला. यासंदर्भात शेट्टी यांच्यावतीने बाजू मांडणारे अ‍ॅड. योगेश पांडे यांनी न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली.

पारंपरिक पद्धतीनुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसांत शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी अदा केली जात होती. मात्र, 21 फेब्रुवारी 2022 रोजी राज्य सरकारने दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, 10.25 टक्के उताऱ्यानुसार पहिला हप्ता आणि हंगाम संपल्यावर चालू उताऱ्यानुसार उर्वरित हप्ता देण्याचा आदेश काढण्यात आला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनांनी तीव्र आंदोलन केले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यासंबंधी कोणताही अधिकृत शासन निर्णय झाला नाही. त्यामुळे राजू शेट्टी यांनी न्यायालयात धाव घेत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे इतिवृत्त सादर केले.

राज्य सरकारवर न्यायालयाचे ताशेरे

सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारवर कडाडून टीका केली. केंद्राच्या ऊस नियंत्रण कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. परिणामी, राज्य सरकारचा एफआरपीचे दोन टप्पे करण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला.

या निकालामुळे राज्यातील साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी द्यावी लागणार आहे, आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार