राज्यातील विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय पक्षांत वेगाने घडामोडी घडत आहेत. भाजपकडून विधान परिषदेच्या तीन जागासाठी 20 जणांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे.






दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी उद्या दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर बैठक होणार आहे. या बैठकीत एका नावावर शिक्कामोर्तब हॊणार आहे. दरम्यान, तीन नेत्यांना कागदपत्रे गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापैकी एकाचे नाव फायनल होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला एकच जागा आली असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार विधानपरिषदेवर कोणाला पाठवणार याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचे नाव रविवारी दुपारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
राजेश विटेकर विधानसभेत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिक्त आहे. या जागेसाठी कोअर कमिटीने निश्चित केलेल्या नावांपैकी काही नावांवर उद्या चर्चा होणार आहे. बैठकीनंतर उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येणार आहे. सध्या पक्षाकडून विधान परिषदेसाठी कागदपत्रे गोळा करण्याच्या सुचना झिशान सिद्धकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या तिघांपैकी एकाला विधानपरिषदेवर संधी मिळणार आहे.
दरम्यान, प्रदेश भाजपकडून 20 जणांच्या नावाची यादी दोन दिवसापूर्वीच दिल्ली दरबारी पाठविण्यात आली आहे. त्यापैकी तीन नावाची घोषणा रविवारी होण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी 17 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रविवारी नावाची घोषणा दिल्लीतून केली जाणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांचे या घोषणेकडे लक्ष लागले आहे.
महायुतीकडे इच्छुकांचा ओढा
सध्या विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे 132 आमदार निवडून आले. तर महायुतीचे एकत्रित 232आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीचेच उमेदवार सहज विजयी होतील, असा अंदाज आहे. त्यामुळेच महायुतीकडील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे इच्छुकांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे आता येत्या काळात या जागेवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.











