विधान परिषदेच्या पाच रिक्त जागेवर संधी मिळावी, यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग करण्यात येत आहे.पाच जागांपैकी तीन जागा ह्या भाजपच्या असून प्रत्येकी एक जागा ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. या पाचही जागांसाठी इच्छुकांची मोठी संख्या सत्ताधाऱ्यांकडे आहे. शिवसेनेच्या एका जागेसाठी मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. सोलापूरमधून माजी आमदार शहाजीबापू पाटील हेही इच्छूक आहेत, त्यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शहाजीबापू पाटील यांना संधी मिळावी, यासाठी साकडे घातले आहे.






भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि शिवसेनेचे आमशा पाडवी हे विधान परिषदेचे आमदार विधानसभा निवडणुकीत जिंकले आहेत. त्यामुळे या पाच जणांच्या विधान परिषदेतील जागा रिक्त झाल्या आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून आता नेमकी कोणा कोणाला लॉटरी लागणार? याची उत्सुकता लागली आहे.
विधान परिषदेतील भाजपचे तीन, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एकेक सदस्य विधानसभा निवडणुकीत जिंकले आहेत. त्यांच्या रिक्त जागांची निवडणूक आयोगाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. बिनविरोध निवडणूक न झाल्यास २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. आमदारकी मिळावी, यासाठी इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे, त्यामुळे रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सोलापूर जिल्ह्यातून सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हेही विधान परिषदेसाठी इच्छूक आहेत. शिवसेनेकडून त्यांना तसा शब्दही दिल्याची चर्चा आहे. शहाजीबापू यांच्याकडून जोरदार फिल्डिंंग लावली आहे.
सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही, त्यामुळे पक्षवाढीसाठी माजी आमदार पाटील यांना संधी दिली जावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. मध्यंतरी त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे शहाजीबापूंनी विधान परिषदेसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
‘काय झाडी, काय डोंगार’फेम शहाजीबापू हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. विधानसभेच्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांना सांगोल्या व्यतिरिक्त इतरत्रही प्रचारासाठी पाठविले होते. त्यामुळे शहाजीबापू पाटील यांच्यासारखा वक्ता शिवसेनेसाठी उपयोगी ठरू शकतो, हे लक्षात घेऊन पाटील यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल, असे बोलले जात आहे.
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे समर्थक असणाऱ्या शिष्टमंडळाने नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्या वेळी माजी आमदार पाटील यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, असे साकडे शिंदे यांना समर्थकांनी घातले आहे, शिंदे यांनीही त्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे, त्यामुळे एका जागेसाठी शिंदे नेमके कोणाला संधी देणार, याकडे सोलापूरसह इतर जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.












