महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालांनंतर आधी मुख्यमंत्रीपद, मग उपमुख्यमंत्रीपद, नंतर मंत्रीपदांचं वाटप आणि शेवटी खातेवाटप या बाबी टप्प्याटप्प्याने चर्चेत राहिल्याचं दिसून आलं.अजूनही तिन्ही सत्ताधारी पक्षांमधल्या ज्या नेत्यांना खातं मिळालं नाही, त्यांची नाराजी जाहीरपणे समोर येत असून त्यासंदर्भात आता पालकमंत्रीपदांवर दावे केले जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं असून त्यांनीही आपण नाराज असल्याचं जाहीरपणे कबूल केलं आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलं आहे.






देवेंद्र फडणवीस – छगन भुजबळ भेट
आज सकाळी छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या ‘सागर’ बंगल्यावर भेट घेतली. या भेटीवेळी राज्यातील सध्याची स्थिती व आपल्या मागण्या यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सर्वकाही सांगितलं असून ते ८ ते १० दिवसांत याबाबत निर्णय घेणार असल्याचं भुजबळ माध्यमांना म्हणाले. पण अजित पवारांबाबत त्यांची नाराजी असल्याचं आता बोललं जाऊ लागलं आहे. त्यामुळे भुजबळांच्या नाराजी प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीसांनी सूचक भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही नाव घेतलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीसांनी आज संध्याकाळी चारच्या सुमारास माध्यमांशी बोलताना याबाबतच्या प्रश्नावर उत्तर दिलं. ‘माझी भुजबळांशी भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितलंय की आमच्यात काय चर्चा झाली. ते महायुतीचे प्रमुख नेते आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयात त्यांचाही महत्त्वाचा वाटा राहिला आहे. स्वत: अजित पवारही त्यांची चिंता करतात’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘भुजबळांना मंत्रीपद नाकारलं तेव्हा अजित पवार म्हणाले…’
छगन भुजबळांना मंत्रीपद नाकारलं तेव्हा त्यांना डावलण्याचा हेतू नव्हता हे अजित पवारांनी आपल्याला सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ‘मुळात भुजबळांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात घेतलं नाही तेव्हा भुजबळांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता, त्यांनी मला त्याबाबत सांगितलं. आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिला आहे. आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे. देशातल्या अन्य राज्यांतही मान्यता असणाऱ्या भुजबळांसारख्या नेत्याला आम्हाला राष्ट्रीय स्तरावर पाठवायचं होतं, असं अजित पवारांनी मला सांगितलं’, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागच्या घडामोडींचा उल्लेख केला.
‘पण अजित पवारांच्या मतापेक्षा भुजबळांचं मत जरा वेगळं होतं. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही सगळे मिळून यावर तोडगा काढू. भुजबळांसारखा नेता आमच्यासोबत राहिला पाहिजे यानुसार या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. एकत्रच निर्णय करायचे आहेत. भुजबळांबद्दल तिन्ही पक्षांमध्ये आदर आहे’, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.











