मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्यांनी नवा वाद पेटला आहे. “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे. मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथे अनेक भाषा बोलल्या जातात.” असे वक्तव्य भैय्याजी यांनी केले होते. मात्र यावरूनच वाद पेटला असून संजय राऊतांसह विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले. या वक्तव्यावर सरकारची भूमिका काय आहे, ते स्पष्ट करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी विधानसबेत केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
भय्याजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. ते पूर्णपणे ऐकून, माहिती घेऊन मी बोलेन.पण सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची , महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या वक्तव्यात, त्या संदर्भात भय्याजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि पुन्हा एकदा शासनाच्या वतीने सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषाही मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कोणत्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्यामुळे तो सन्मान आहेच. म्हणूनच शआसनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीसांनी केला.
काय आहे प्रकरण ?
मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी मुक्ताफळं उधळली. ते घाटकोपर येथील एका कार्यक्रमात मुंबईच्या भाषिक वैशिष्ट्यावर बोलत होते. “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तर गिरगावात हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणार्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.” असं वक्तव्य करून त्यांनी वाद ओढावून घेतला.