बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी चार्जशीट दाखल केल्यानंतर आज त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एसआयटी अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी आता तपासाचा पार्ट टू सुरू झाला आहे. पार्ट टू मध्ये सगळ्यांचा पर्दाफाश होईल, असे ते म्हणाले. न्यायालय समितीचे काम लवकरात लवकर चालू करावं, अशी विनंती धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
“येत्या 27 तारखेला चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. आज आम्ही अनिल गुजर यांना भेटलो तपासाबाबत चर्चा झाली. स्पेशल केस म्हणून या तपासाकडे सगळ्यांनी पाहिल आहे. आता हे एक टप्पा झाला आहे. आता या तपासाचा पार्ट टू इथून पुढे चालू होईल. राहिलेल्या आरोपीला पकडायचं हे पोलीस यंत्रणेपुढे आवाहन असणार आहे. पार्ट टू मध्ये राहिलेले जे कोणी आहेत, ज्याच्या कुणामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या, कोण यांचा सगळ्याची पाठराखण करत होता, याची चौकशी होईल. जिल्ह्यातील खून प्रकरण, एवढे गुन्हे कशाच्या जीवावर केले आणि त्या गोष्टीला धरून गुन्हेगारी वाढवली. बीड जिल्ह्यात चुकीच्या गोष्टी करून राज्यात चुकीची ओळख निर्माण केली, त्याचा सगळा पर्दाफाश पार्ट टू मध्ये होईल”, असे धनंजय देशमुख म्हणाले.
“त्याच्यामध्ये काही पण होऊ शकतं. महत्त्वाचा पार्ट इथून पुढे आहे. उघड उघड यामध्ये आरोपी होते, व्हिडीओ आहेत, फोटो आहेत, सीसीटीव्ही आहेत आणि एक आरोपांची कडी जोडली आहे. पडद्यामागून कारनामे करण्याचे षडयंत्र, यांना जे कोणी अभय देत असेल. त्यामध्ये डिपार्टमेंटचे सुद्धा लोक असू शकतात. इतरही लोक असू शकतात, तो तपास लवकर चालू होणार आहे. चार्जशीटचे जे बुलेट पॉईंट काढले आहेत. 53 पानाचे ते मिळाले आहेत. मुख्य चार्जशीट मिळायची बाकी आहे”, असेही धनंजय देशमुख यांनी सांगितले.
“त्यांच्या विरोधात संतापाची लाट”
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की न्यायालय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यांनी लवकरात लवकर त्या मार्फत या जिल्ह्याची परिस्थिती अशी का झाली, त्याला कोणता व्यक्ती जबाबदार आहे, कोणती संस्था जबाबदार आहे याचा तपास लवकरात लवकर सुरू व्हावा”, असे धनंजय देशमुखांनी म्हटले.
“माझा न्यायाचा लढा आहे. कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना माझ्या भावाला संपवलं. स्वतःचा भाऊ, स्वतःचा मुलगा समजून या गोष्टी कधी कधी लक्ष दिलं नाही, पाठराखण केली जाते चुकीच्या माणसाचा समर्थन केलं जातं. असं बोटावर मोजण्या इतपत लोक आहेत. सगळे लोक न्यायाच्या भूमिकेत आहेत. जे अन्यायाच्या भूमिकेत चुकीला चूक म्हणणारे जे कोणी लोक नाहीत. त्यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. आक्रोश आहे. त्या संदर्भात मी काही बोलणार नाही”, असे धनंजय देशमुख म्हणाले.
“मला त्याच्यावर काही बोलायचं नाही”
“येत्या 12 मार्चच्या आधी उज्ज्वल निकम साहेबांची भेट घेण्याचा आमचा मानस आहे. आम्ही त्यांना भेटू चार्जशीटबद्दल त्यांच्याकडून काही गोष्टी आहेत. ज्या दिवशी नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली, म्हणून दुसऱ्या दिवशी लगेच मी भेट घेतली. आदल्या रात्री सगळं असत्य सांगितलं गेलं होतं. म्हणूनच पुढच्या दिवशी जे सत्य आहे ते मी सांगायला गेलो होतो. त्यांची जी चूक झाली होती ते म्हटले की अजानतेपणाने मी या गोष्टी बोललो होतो. जे आम्ही पुरावे दिले, ज्या गोष्टी वास्तव आहेत. त्या गोष्टीमुळे आज त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्याच्यावर ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या एकदम चुकीच्या होत्या. हे आज सिद्ध झालं आम्ही सांगितलेल्या गोष्टी खऱ्या होत्या हे पण सिद्ध झालं”, असे धनंजय देशमुख म्हणाले.
“पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आहे, त्यांनी कधी यायला पाहिजे होतं. कधी जायला पाहिजे होतं. हे सगळे मुख्यमंत्र्यांचे अधिकार होते. उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार होते. त्यांनी प्रतिक्रिया आज दिली, त्यांनी अगोदर कधी दिली असती तर त्यांचा विचार केला असता, राजीनामा झाल्यानंतरची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही”, असे धनंजय देशमुखांनी म्हटले.