बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला २०२४ ला निर्घृण हत्या करण्यात आली. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला. बीडमधील गुन्हेगारीचे सत्र संपता संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे. त्यातच आता बीडच्या शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कुख्यात गुंड आणि भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली होती. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर येत होती. या प्रकरणानंतर अखेर सतीश भोसले यांनी स्पष्टीकरण दिले आहे.






सतीश भोसले यांनी नुकतंच बीडमधील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना घडलेल्या संपूर्ण प्रकरणाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केली. “त्या व्यक्तीने माझ्या मित्राच्या बायकोची छेड काढली, म्हणून मी मारहाण केली”, असे स्पष्टीकरण सतीश भोसले यांनी दिले.
“मी शांत बसणार नाही”
“मी मारहाण केली आहे. मी कबूल करतो. त्याचे कारण वेगळे आहे. मित्राच्या बायकोची त्यांनी छेड काढली म्हणून मी मारहाण केली आहे. मला पोलिसात जायला हवं होतं. मात्र ती वेळ नव्हती. मला राग आला होता, म्हणून मारहाण केली. कुठल्याही मुली आणि महिलांची छेड काढल्यावर मी शांत बसणार नाही. मला जे योग्य वाटलं ते मी केलं”, असे सतीश भोसले म्हणाले.
“मी पारधी समाजातील लहान कार्यकर्ता आहे. कोविड काळामध्ये माझं हे काम बघा. मी कुठलाही गुंड आणि दहशत करणारा नाही. माझ्याबद्दल चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. मी कुठलाही गुन्हेगार नाही. जी कारवाई होईल त्याला मी सामोरे जाईल”, असेही सतीश भोसलेंनी म्हटले.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील अमानुष मारहाणीचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत एक पांढरा शर्ट परिधान केलेला व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीला एक जण बॅटने मारहाण करताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला काही व्यक्ती उभ्या असल्याचे दिसत आहेत. त्यादेखील त्याला मारहाण करताना दिसत आहे. त्या व्यक्तीला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मारहाणीचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात होते. यात सतीश भोसलेने बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील एका गरीब व्यक्तीला मारहाण केली. या मारहाणीत संबंधित व्यक्तीचे सगळेच दात तुटले असल्याची माहिती समोर येत आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे पोलिसांसोबतच संबंध असल्याची सुद्धा माहिती समोर आली होती. यामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता.











