संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त सलग दोन दिवस दोन्ही सभागृहांमध्ये विशेष चर्चासत्र सुरू आहे. या चर्चेदरम्यान,सत्ताधारी -विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु, राजीव गांधी, इंदिरा गांधी, काँग्रेसवर यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली.






लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी संविधानावरुन भाजपला टीकेची तोफ डागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत तुफानी भाषण करत त्यांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी पंडित नेहरु, इंदिरा गांधी,राजीव गांधी यांच्यासह काँग्रेसवर गंभीर आरोप केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (ता.13) इतिहासातील दाखले देत आपल्या भाषणातून काँग्रेसवर एकापाठोपाठ एक असे शाब्दिक हल्ले चढवले.ते म्हणाले,विविधतेत एकता ही भारताची ताकद आहे.आपल्या देशाची प्रगतीही विविधतेत एकता साजरी करण्यावर आहे.
मात्र, गुलामीची मानसिकता असलेल्या लोकांनी,विविधतेत विरोधाभास शोधणं सुरु ठेवलं. विविधेतील एकतेत विष पेरण्याचं काम करत काँग्रेसकडून देशातील एकतेवर घाला घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, असंही मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
तसेच मोदी म्हणाले, आपल्या खेदाने हे नमूद करावं लागत आहे की,संविधान निर्मात्यांच्या मनात एकता होती. पण स्वातंत्र्यानंतर विकृत मानसिकता किंवा स्वार्थामुळे देशातील एकतेवर प्रहार करण्यात आला. काँग्रेसनं मनमानी कारभार केला.आणीबाणी लादली असा आरोपही मोदींनी केला.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 गंभीर आरोप
1- आणीबाणी हे काँग्रेसचं पाप.
2- काँग्रेसनं लोकशाहीचा गळा घोटला.
3- पंडित नेहरूंनी संविधान बदललं पाहिजे असं म्हटलं होतं, पत्राचा दाखला.
4- 55 वर्षे एका कुटुंबानं देशावर राज्य केलं.
5- इंदिरा गांधींकडून सत्तेचा गैरवापर,पहिल्यांदा कुनीती वापरली.
6- कट्टर पंथियांना समर्थन देत राजीव गांधींनीही संविधानाला धक्का देण्याचं काम केलं.
7-काँग्रेसनं न्यायालयाचे पंख छाटण्याचं काम केलं.
8- काँग्रेसच्या कुनीतीची परंपरा आजही कायम आहे.
9- आणीबाणीच्या काळात देशाला तुरुंग बनवण्यात आलं होतं.
10- काँग्रेसनं वेळोवेळी संविधानावर हल्ले केले. गेल्या 60 वर्षांत 75 वेळा संविधान बदलण्यात आलं.












