मंत्रीपदाची शपथ कोण घेणार? याद्या ठरल्या? ‘या’ आमदारांच्या नावांची जोरदार चर्चा!

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागून जवळपास तीन आठवडे उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप मंत्रीमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडलेला नाही. खुद्द मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निकालानंतर १२ दिवसांनी शपथ घेतली. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? याविषयी दावे केले जात असतानाच या मंत्रीमंडळ विस्तारात कोण शपथ घेणार? याचीही जोरदार चर्चा सध्या रंगताना पाहायला मिळालं आहे. याद्या तयार झाल्या असून केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचं विधान देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत केलं होतं. त्यामुळे आता संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली आहे.

गृहमंत्रीपदाचा तिढा सुटला?

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

शिवसेना (एकनाथ शिंदे) गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा असून त्यासाठीच एकनाथ शिंदे शेवटच्या काही तासांपर्यंत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास संमती देत नव्हते, असेही दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्रीपदाचा तिढा सुटल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीसांकडेच गृह खात्यासह अर्थखात्याचाही कारभार असेल अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदेंकडे महसूल खात्यासह नगरविकास खातं जाऊ शकतं, तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सार्वजनिक बांधकाम व गृहनिर्माण खात्याचा कारभार दिला जाऊ शकतो.

भाजपाच्या यादीत कुणाचा समावेश?

दरम्यान, तिन्ही सत्ताधारी पक्षांच्या मंत्रीपदांच्या याद्या तयार झाल्याचं बोललं जात आहे. यात अनेक नावांची चर्चा पाहायला मिळत आहे. यात राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाकडून राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, अतुल सावे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, जयकुमार रावल, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भातखळकर, नितेश राणे व गोपीचंद पडळकर या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

एकनाथ शिंदेंच्या यादीत कुणाचा समावेश?

एकनाथ शिंदेंकडून पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये उदय सामंत, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, आशिष जयस्वाल व योगेश कदम या आमदारांची मंत्रीपदासाठी चर्चा आहे.

अजित पवारांच्या यादीत कुणाचा समावेश?

सत्ताधारी महायुतीमधला तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) यादीतही संबंधित आमदारांची नावं असल्याची चर्चा आहे. त्यात छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे व मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद तर सना मलिक व इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रीपद मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

अधिक वाचा  पुण्यात भाजपा मित्र पक्षाला मोठा धक्का; भाजपलाही धक्कादायक प्रवेशामुळे ही नवी भिती! एकावेळी २०० कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा