अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणार नाही. आम्ही चार आठवड्यांचे अधिवेशन ठेवले आहे. येत्या अधिवेशनात प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची आमची तयारी आहे. महायुतीचे सरकार चांगलं चालावं यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. राज्य विधिमंडळाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चार आठवडे चालणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.






राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली.
‘वास्तविक सरकार नवीन येत असतात. जनतेच्या मनात असेल तर बदल करत असते. चांगले काम केल तर जनता सरकारला पुन्हा संधी देत असते. आम्हाला प्रचंड बहुमत मिळाले . आमचं सरकार चांगलं चालावं. आमचं काम व्यवस्थित चालू आहे. आम्हाला विरोधकांशी चर्चा करायची होती. मात्र, विरोधकांनी भलंमोठं पत्र सरकारला दिलंय. आमची विरोधकांशी चर्चा करायची तयारी आहे, असे अजित पवार यांनी सांगितलं.
‘आमचं 238 आमदारांचं बहुमत आहे. विरोधी पक्षाकडे फक्त ५० आमदार आहेत. आम्ही बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणार नाही. आम्ही चार आठवड्यांचं अधिवेशन ठेवलं आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी अधिवेशन ठेवून पुण्यश्री अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. आम्ही त्यांच्याविषयी चर्चा ठेवली आहे. अशा प्रकारे महायुतीचं सरकार प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीत आहे, असे पवार पुढे म्हणाले.
‘विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर उत्तर देऊ. कारण नसताना विरोधाला विरोध होत असेल तर, त्याला किती महत्व द्यायचं हे त्यानुसार ठरवलं जाईल. असं साधारण अधिवेशन चालवलं जाईल. जी बिले येतील, त्यावर चर्चा होईल. त्यावर साधक बाधक चर्चा होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.











