स्वारगेट बस स्थानकात तरूणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न आहे. रिकाम्या शिवशाही बसमध्ये पहाटे दत्तात्रय गाडे नराधमाने हे कृत्य केले. त्यानंतर आता आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचेही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला पकडून देणाऱ्याला एक लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.






या घटनेनंतर स्वारगेट स्थानकातील सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) या घटनेवेळी ऑन ड्युटी 23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षकांना कामावर रुजू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचवेळी स्वारगेटचे आगार प्रमुख आणि वाहतूक नियंत्रक यांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
या सगळ्या कारवाईमध्ये स्वारगेट आगार प्रमुखांनी अवघ्या सहा दिवसांपूर्वी स्वारगेटच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लिहिलेली दोन पत्र व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही हे पत्र पोस्ट केले आहे. या दोन्ही पत्रांमध्ये आगार प्रमुखांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला होता.
खाजगी एजंट, तृतीयपंथी हे प्रवाशांना त्रास देतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आगार प्रमुखांनी केली होती. तर दुसऱ्या पत्रात बस स्थानक परिसरात अवैधरित्या रिक्षा पार्किंगबाबतही तक्रार करण्यात आली होती. या सगळ्या प्रकरणाबाबत आपल्याकडे अनेकदा तक्रार केली होती, पण कसलीही कारवाई न झाल्याबद्दल आगार प्रमुखांनी खेद व्यक्त केला होता.
आगार प्रमुखांच्या पत्रात काय आहे?
खाजगी एजंट आणि तृतीयपंथीवरील कारवाईबाबतचे पहिले पत्र :
स्वारगेट आगारात कायमच प्रवाशांची गर्दी असते. पुर्ण महाराष्ट्रातून प्रवाशी चढ उतार होत असते. रोजचे किमान 40 ते 45 हजार प्रवाश्यांची वर्दळ स्वारगेट बसस्थानक परिसरामध्ये असते. तरी सदर ठिकाणी खाजगी एजंट हे बसस्थानक परिसरामध्ये येऊन गाडीतून, रांगेतून प्रवाशी ओढून नेतात व त्यांना खाजगी गाडीतून प्रवास करण्यास उद्युक्त करतात.
सदर बाब ही अत्यंत गंभीर व चुकीची आहे. सदर बाबतीत त्यांचेवर योग्य ती कडक कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार हे आपणास आहेत. तरी याबाबत या अगोदरही अनेकदा पत्रव्यवहार आलेला आहे. परंतु खेदजनक बाब अशी आहे की, अद्यापर्यंत कोणतीही कारवाई अथवा यांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली नाही.
तसेच सध्या आगारात तृतीयपंथी लोकांचा नाहक वर्दळ आणि दमदाटी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सदर लोक ही मद्यपान करून, अतिशय गलिच्छ आणि घाणेरडे पेहरावामध्ये आहोरात्र आगारामध्ये वावरत असतात. स्वारगेट आगार हे प्रवाश्यांच्या सोयीसाठी व प्रवाश्यांसाठी असलेले ठिकाण आहे. उगाच दमदाटी आणि लुटमार करण्यासाठीचे ठिकाण अजिबात नाही.
प्रवाशांची गर्दी आणि असाहय्यता पाहून सदर तृतीयपंथी लोक हे महिला, वृध्द प्रवाशी लहान मुले यांना स्पर्श करून जबरदस्ती करून त्यांना वेठीस धरून त्यांच्याकडून पैसे घेत आहेत. सदर बाब हि अत्यंत चुकीची आणि प्रवाशांची लुटमार आहे. तरी सदर बाबतीत आपणाकडून सदर खाजगी एजंट आणि तृतीयपंथी यांचेवर कडक कारवाई होऊन त्यांना आगारात येण्सास पूर्णपणे मज्जाव आपणामार्फत करण्यात यावा. हि विनंती. सदर बाब आपल्या माहितीस्तव व पुढील कार्यवाहीसाठी सादर.
अवैध रिक्षा वाहतुकीवर कारवाई करण्याचे आगार प्रमुखांचे दुसरे पत्र :
स्वारगेट आगारात रोज किमान अंदाजे 1700 बस गाड्यांचे संचलन होत असते. रा. प. स्वारगेट आगाराच्या इनगेट व आउट गेटला अवैध प्रकारे रिक्षा या पार्किंग केलेल्या असतात. सदर रिक्षा पार्किंग हे आगाराच्या आवारात केले जाते. जे की अतिशय नियमबाह्य आहे, शिवाय सदर रिक्षा चालक हे प्रवाशांशी अतिशय उध्दट व उर्मटपणे वर्तन करीत असतात.
त्यांच्या अवैध पार्किंगमुळे रा.प. बस गाड्याच्या संचालनासाठी पुरीशी जागा मिळत नाही आणि सदर आउट गेट आणि इनगेट वर विनाकारण वाहतूक कोंडी घेऊन त्याचा बाहेरील रस्त्यावर ताण येत आहे. वरील सर्व प्रकारामुळे आगारात व बाहेरील रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
तसेच सदर रिक्षा थांबत असलेल्या ठिकाणी हे परिवहन विभाग यांच्या नियमाविरुद्ध आहे. तरी सदर बाबतीत आपणाद्वारे कडक कारवाई करून आगारातील रिक्षा या पूर्णपणे हटवून खाजगी गाड्यांना अटकाव करण्यात यावा जेणेकरून कोणताही अघटीत प्रकार घडणार नाही व कायदा सुव्यवस्था नांदेल. तरी सदर बाबतीत आपणाकडून सहकार्य मिळावे.











