भारतीय संघ उद्या पाकिस्तानविरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा सामना खेळणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर दुपारी २.३० वाजता कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा सामना सुरू होईल. पण सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. उद्याच्या सामन्याला भारताचा स्टार क्रिकेटपटू मूकणार आहे. भारताच्या विकेटकीपर फलंदाज पाकिस्तान सामन्यापूर्वी आजारी पडल्यामुळे तो उद्याचा सामना खेळू शकणार नाही.






पाकिस्तानविरूद्ध सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत शुभमन गिलने भारत-पाकिस्तान सामन्याचा फरक पडत नसल्याचे सांगितले. गिल म्हणाला, ” भारत-पाकिस्तान सामन्याचा आम्हाला फरक पडत नाही. अंतिम सामना हा कोणत्याही स्पर्धेतील मोठा सामना असतो. आम्ही प्रत्येक सामना जिंकण्यासाठी खेळतो.’
‘त्याचबरोबर उपकर्णधारपदाचा देखील माझ्या फलंदाजीवर परिणाम होत नाही. ज्यावेळी मी फलंदाजी करतो, त्यावेळी मी एक फलंदाज म्हणून खेळत असतो. अफगाणिस्तानविरूद्ध मी समाधानकारक शतकी कामगिरी केली. तिथे दबाव नक्कीच होता, पण आम्हाला खात्री होती की आम्ही हा सामना जिंकू, कारण लक्ष्य छोटे होते.’
‘माझा प्रत्येक सामन्यात शतकी खेळी करण्याचा प्रयत्न असतो. जर मी चांगली सुरूवात केली, तर मी मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही फलंदाजाला एकदा सेट झाल्यावर मोठी खेळी करायची असते,” गिल पुढे म्हणाला.
त्याचबरोबर गिलने भारतीय विकेटकीपर रिषभ पंत आजारी असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगितले. रिषभने आजच्या सराव सत्राला देखील अनुपस्थिती दाखवली. त्यामुळे रिषभ पंत दुसऱ्या सामन्यातही प्लेईंग इलेव्हनचा भाग नसेल, हे निश्चित झाले आहे.
भारतीय संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, हर्षित राणा.











