इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील प्लेऑफला सुरुवात झाली आहे. दरम्यान, क्वालिफायर वन आणि एलिमिनेटर सामना अहमदाबादला खेळवला जाणार होता. पण त्याआधीच सोमवारी रात्री गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने अहमदाबादच्या विमानतळावरून ISIS च्या चार संशयीत दहशतवाद्यांना अटक केल्याचे समजत आहे. यानंतर मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या क्वालिफायर सामन्यासाठी कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती.
दरम्यान आता असे समोर येत आहे की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सराव सत्र रद्द केले. तसेच बुधवारी बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघात होणाऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांची पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली. मंगळवारी क्वालिफायर वन सामना होणार असल्याने बंगळुरू आणि राजस्थान संघांसाठी नरेंद्र मोदी स्टेडियम सरावासाठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांना सरावासाठी गुजरात कॉलेज ग्राऊंड सरावासाठी पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, बंगळुरूने सरावाला नकार दिला, तर राजस्थानने मात्र सराव केला.
आनंदबाझार पत्रिकाने दिलेल्या वृत्तानुसार गुजरात पोलीस अधिकाऱ्यांनी कल्पना दिले की बंगळुरूने त्यांचे सराव सत्र रद्द करण्यामागे आणि दोन्ही संघांची पत्रकार परिषद रद्द करण्यामागे प्राथमिक कारण विराट कोहलीच्या जीवाला धोका, हे आहे.
अहमदाबाद विमानतळावरून अटक केलेल्या संशयितांकडून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्यांच्याकडे संशयीत व्हिडिओ आणि मेसेज सापडले आहेत. याबाबतची माहिती राजस्थान आणि बंगळुरू संघाला देण्यात आली होती, ज्यावर राजस्थानने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण बंगळुरूने सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवले की ते सराव करणार नाहीत.
तसेच रिपोर्ट्सनुसार बंगळुरूने सराव रद्द करण्यामागील कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही. राजस्थान आणि बंगळुरू सोमवारी अहमदाबादला पोहचले होते.
पोलीस अधिकारी विजय सिंह ज्वाला यांनी सांगितले की ‘अहमदाबादला आल्यानंतर विराट कोहलीला चार जणांच्या अटकेबद्दल कळाले. तो देशासाठी मौल्यवान आहे आणि त्याची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे.’
‘बंगळुरूला अधिक जोखीम घ्यायची नाहीये. त्यांनी आम्हाला सराव न करणार असल्याचे सांगितले आहे. राजस्थान रॉयल्सलाही याबाबत कळवण्यात आले आहे, पण त्यांना सराव करण्यासाठी काहीही समस्या नव्हती.’
याशिवाय अशीही माहिती मिळत आहे की बंगळुरू संघाच्या हॉटेल बाहेरील सुरक्षा अत्यंत कडक केली आहे. त्याचबरोबर बंगळुरू संघासाठी वेगळा प्रवेश मार्गही तयार करण्यात आला असून तिथून इतर कोणालाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. पत्रकारांनाही प्रवेश देण्यात आलेला नाही. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स संघानेही मैदानात येताना ग्रीन कॉरिडोरचा वापर केला होता. त्याचबरोबर राजस्थानने कडक सुरक्षा व्यवस्थेत सराव केला.
दरम्यान, राजस्थान आणि बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजता चालू होणार आहे.