दिल्लीत 27 वर्षांनी सत्तेत कमबॅक करणाऱ्या भाजपानं नवा मुख्यमंत्री जाहीर केला आहे. रेखा गुप्ता यांची भाजपानं दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे. गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी सुषमा स्वराज (भाजपा), शिला दीक्षित (काँग्रेस), आतिषी (आम आदमी पक्ष) या महिलांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषविले आहेत.
कोण आहेत रेखा गुप्ता?
दिल्लीतील नवनिर्वाचित भाजपा आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रेखा गुुप्ता या दिल्लीतील शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 50 वर्षांच्या गुप्ता यापूर्वी दक्षिण दिल्ली नगर निगमच्या महापौर होत्या. विशेष म्हणजे त्यांची ही आमदारकीची पहिलीच टर्म आहे.
रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणातील जिंद जिल्ह्यात 1974 साली झाला. त्या दोन वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंबीय दिल्लीत स्थायिक झाले. रेखा गुप्ता यांचे वडिल स्टेट बँकेत मॅनेजर होते. त्यांनी एलएलबीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांचं संपूर्ण शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे.कॉलेजमध्ये असतानाच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) संपर्क आला. त्या अभाविपच्या कामात सक्रीय होत्या. दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
रेखा गुप्ता या दिल्ली भाजपाच्या सरचिटणीस आणि भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष देखील आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शालीमार तदारसंघातून विजय मिळवला. गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा पराभव केला. या निवडणुकीत रेखा गुप्ता यांना 68200 मतं मिळाले. तर वंदना कुमारी यांना 38605 मतं मिळाली होती.
कोणती गोष्ट ठरली निर्णायक?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या(RSS) सुचनेनंतर रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याचं मानलं जात आहे. आरएसएसनंच महिला मुख्यमंत्रीचा प्रस्ताव दिला होता. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्त्वानं तो प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर त्यांच्या नावाची आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. गुप्ता बुधवारी (20 फेब्रुवारी 2025) दुपारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.