चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा 60 रन्सनी पराभव केला. न्यूझीलंडनं दिलेलं 321 रन्सचं आव्हान पाकिस्तानला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 47.2 ओव्हर्समध्ये 260 रन्सवरच ऑल आऊट झाली.
पाकिस्तानचं आव्हान धोक्यात!
पाकिस्तानमध्ये तब्बल 29 वर्षांनी आयसीसीची स्पर्धा होत आहे. पहिल्या मॅचमध्ये यजमान टीम जिंकेल अशी त्यांच्या फॅन्सना आशा होती. पण, मोहम्मद रिझवानच्या टीमनं त्यांची निराशा केली. पाकिस्तानचा सुपरस्टार बाबर आझमनं हाफ सेंच्युरी झळकावत 64 रन काढले. पण, त्यासाठी त्यानं तब्बल 90 बॉल बॉल घेतले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीमला सर्वाधिक गरज असताना तो आऊट झाला.
पाकिस्तानचा पुढील सामना 23 तारखेला भारताविरुद्ध दुबईत होणार आहे. तर शेवटची लढत बांगलादेशविरुद्ध होत आहे. आजच्या पराभवानंतर गतविजेत्या पाकिस्तानला सेमी फायनल गाठण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकावेच लागतील. अन्यथा त्यांचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येऊ शकतं.
न्यूझीलंडकडून दोघांची सेंच्युरी
त्यापूर्वी न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटिंग करताना खराब सुरुवातीनंतरही निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 5 आऊट 320 पर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून विल यंग (Will Yung) आणि टॉम लॅथम (Tom Latham) यांनी सेंच्युरी झळकावली. यंगनं 107 तर टॉम लॅथमनं नाबाद 118 रन केले. ग्लेन फिलिप्सनं 39 बॉलमध्ये 61 रनची आक्रमक खेळी करत न्यूझीलंडला 320 चा टप्पा गाठून दिला. न्यूझीलंडचा पुढील सामना 24 तारखेला बांगलादेशविरुद्ध होणार आहे.