उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

0
1

महायुतीमधील मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर सुरू झाल्याचे सांगत लवकरच शिवसेना शिंदे गटात माजी आमदार व खासादारांचे प्रवेश होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, आता ठाकरेंना धक्का देत शिवसेना शिंदे गटात अनेकजण प्रवेश करत आहेत. कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचा निष्ठावंत चेहरा म्हणून ज्यांचा निवडणुकांवेळी उल्लेख झाला त्या राजन साळवी यांनीही ठाकरेंची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेतला. तर, आमदार भास्कर जाधव हेही पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, कोकणातून ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. त्यातच, आता दापोली नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या 5 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपण वेगळा गट स्थापन करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, ठाकरेंच्या शिवसेनेतील आऊटगोईंग काही केल्या कमी होताना दिसून येत नाही.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

एकीकडे कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडत असल्याचे पाहायला मिळत असतानाच, दुसरीकडे मुंबईतील उपविभाग प्रमुखाने देखील साहेब मला माफ करा म्हणत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षातील राजकीय वर्तुळात अनेक खलबतं घडत असतानाच, आता दापोलीतून 5 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दापोली नगर पंचायतीमध्ये शिवसेना उबाठाला खिंडार पडले असून पाच नगरसेवकांनी आपला वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे, आवश्यक त्या कागदपत्रांची देखील पूर्तता केली आहे. हे पाचही नगरसेवक करणार उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेना उबाठात या 5 नगरसेवकांनी प्रवेश केला होता. मात्र, आता विकासकामांसाठी आपण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विलास शिगवण, अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके आणि अश्विनी लांजेकर यांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

वैभव नाईक मातोश्रीवर

दरम्यान, कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेची वाताहात होत असतानाच माजी आमदार वैभव नाईक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. वैभव नाईक यांच्या मागे मागील काही दिवसांपासून एसीबी (ACB) चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. तर कोकणात अनेक पदाधिकारी ठाकरे गटाची साथ सोडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी वैभव नाईक दाखल झाले आहेत.

उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला मातोश्रीवर बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे खासदार आणि आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आदित्य ठाकरे यांनी खासदारांची दिल्लीत बैठक घेतली होती. सध्या, ऑपरेशन टायगरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत, तशा राजकीय घडामोडीही घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे 20 फेब्रुवारीला खासदारांची आणि 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक घेणार आहेत.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय