उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का, आदित्यंचा सगळ्यात जवळचा साथीदार पक्ष सोडणार

0

लोकसभेला जोमात असलेल्या पण विधानसभेला गाफील राहिल्याने निकाल विरोधात गेल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चाललेली आहे. भविष्यातील संधी ओळखून अनेक सहकारी त्यांची साथ सोडत आहेत. तीन टर्मचे राजापूर लांजाचे आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला.

मुंबई महानगरपालिकेसह इतरही महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरे यांचे थंडावलेले रुप पाहता कार्यकर्तेही चिंतेत आहेत. गद्दार पालुपदच किती दिवस म्हणायचे? अशी कुजबूजही कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. विधानसभा गमावूनही पक्षनेतृत्व हवा तसा कार्यक्रम देत नाही किंबहुना पदाधिकारी कार्यकर्त्यांचे म्हणणेच ऐकून घेत नसल्याचे चित्र पाहता महत्त्वकांक्षी नेत्यांनी आपापले निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

आदित्यंचा खांद्याला खांदा लावून काम करणारा नेता फोडला

माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच ठाकरे गटाच्या युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांनीही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी १६ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या सर्वांत जवळचे पदाधिकारी म्हणून रुपेश कदम यांची ओळख आहे. युवासेनेच्या संघटनवाढीत त्यांचे मोठे योगदान मानले जाते.

संघटना वाढीसाठी रुपेश कदम यांनी तोलामोलाची भूमिका

रुपेश कदम यांच्यासोबत महाराष्ट्रातील त्यांचे असंख्य कार्यकर्ते देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत. आदित्य ठाकरे ज्यावेळी सरकारमध्ये काम करत होते, त्यावेळी संघटना वाढीसाठी रुपेश कदम यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे सांगितले जाते. आदित्य ठाकरे यांचे खास आणि विश्वासू निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

दिंडोशीत सुनील प्रभू यांना तिकीट रुपेश कदम नाराज

दिंडोशी विधानसभेतून सुनील प्रभू यांना तिकीट दिल्याने रुपेश कदम नाराज होते. यंदाच्या विधानसभेला त्यांना दिंडोशी विधानसभेतून उमेदवारी हवी होती. त्यामुळे निवडणूक काळापासूनच ते पक्षावर नाराज होते. अखेर निकालाच्या दोन महिन्यांनंतर त्यांनी पुढील राजकारणाचा रस्ता साफ करून शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने युवा शिवसैनिकांचा भरणा मोठ्या प्रमाणात पक्षात होऊ शकतो, असे सांगितले जाते.