पुणे दळणवळण गतिमान करण्यास येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग; १५२६ कोटी रुपये खर्च केले जाणार प्रथमच वेळेवर अर्थसंकल्प सादर

0

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बारावी सभा मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आज झाली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामध्ये एकूण १२ विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात २०२५-२६ च्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे. ४५९३ कोटी जमा आणि ४२९५ कोटी खर्च असा २९८ कोटी शिलकीच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. पर्यटन, तीर्थक्षेत्र, औद्योगिक परिसराला जोडणाऱ्या रस्ते विकासावर भर दिला जाणार असून त्यावर १५२६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुण्याचे दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे.

मुंबई येथे झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे पाटील, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, मुख्य लेखापाल पद्मश्री तळेकर आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्राधिकरणाच्या विविध विषयांवर चर्चा झाली व विषयांना मंजुरी दिली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

‘अर्बन ग्रोथ सेंटर’

प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी ६३६.८४ कोटी रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी बैठकीत २०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.’अर्बन ग्रोथ सेंटर’ करीता रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी १५२६ कोटी रुपयांची तरतूद केली. पुणे शहर वळण मार्ग, पुणे सातारा आणि पुणे नगर रस्त्यापासून पुरंदर विमान तळाला चांगली ‘ कनेक्टिव्हिटी ‘ तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

इतिहासात प्रथमच वेळेवर अर्थसंकल्प सादर

पीएमआरडीएचे मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष आहेत. पीएमआरडीएची स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत कधीही वेळेवर अर्थसंकल्प सादर झाला नाही. कारण मुख्यमंत्र्यांना पीएमआरडीसाठी वेळ मिळत नसल्याचे कारण सांगितले जात होते. मात्र, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात प्रथमच वेळेवर अर्थसंकल्प सादर झाला आहे. त्यामधून ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होईल.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

– डॉ योगेश म्हसे पाटील, आयुक्त, पीएमआरडीए