एका लग्न सोहळ्यात रात्रीच्या वेळी अचानक एक बिबट्या घुसल्यानं गोंधळ उडाला. परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावऱण निर्माण झालंय. उत्तर प्रदेशातल्या लखनऊमध्ये ही घटना घडलीय. शहरातल्या बुद्धेश्वर एमएम लॉनमध्ये लग्न सोहळा सुरू होता. यावेळी पाहुणे जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धावत सुटले. बिबट्याने रेस्क्यू पथकातील एका कर्मचाऱ्यावर हल्ल्याचाही प्रयत्न केला. जवळपास ८ तास हे रेस्क्यु ऑपरेशन सुरू होतं






बिबट्या लग्न सोहळ्याच्या ठिकाणी घुसल्याचं समजताच जीवाच्या भीतीने सगळे इकडे-तिकडे धावायला लागले. एकाने छतावरूनच उडी मारली. यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. बिबट्या घुसल्याची माहिती समजताच डीएफओ डॉ. सीतांशु पांडे यांच्यासह वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल केली. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर बिबट्याला पकडण्यात आलं. बिबट्याला पकडेपर्यंत लग्न सोहळ्यातील सगळेच घाबरले होते.
घटनास्थळी पोलीस, वन विभागाची टीम आणि प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. त्यावेळी लोकांना शांत राहण्याचे आणि वन विभागाच्या टीमला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. बिबट्याच्या रेस्क्यु ऑपरेशनचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. यात पोलीस आणि वन विभागाची टीम पायऱ्यांवर बिबट्याला पाहते. तिथं पोलिसांवरही बिबट्यानं झडप घातली.
बंदुका घेऊन वनविभागाचे अधिकारी पायऱ्यांवरून वरती जात होते. तेव्हा वरच्या बाजूला बसलेल्या बिबट्याने अचानक एका कर्मचाऱ्यावर झडप घातली. बिबट्यानं कर्मचाऱ्याची बंदूक ओढली. शेवटी कसेबसे कर्मचारी पायऱ्यांवरून उतरून बाहेर आले.
व्हिडीओमध्ये दिसतं की बिबट्या एका वन कर्मचाऱ्यावर हल्ला करतो. त्याच्या हातातली रायफल ओढतो. यावेळी इतर कर्मचाऱ्यांपैकी कुणीतरी गोळीबार केल्यानं बिबट्या घाबरून मागे सरकतो. रेस्क्यु पथकातील एक जण म्हणतो की बिबट्याला गोळी लागलीय. जवळपास ८ तास रेस्क्यु ऑपरेशन सुरू होतं. गुरुवारी पहाटे चार वाजता बिबट्याला पकडण्यात आलं.










