ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि संबंधित महिला यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.त्यामध्ये ‘मी थोडीसी सोय करतो,’ असे विधान रामराजेंनी केल्याचे दिसत आहे, त्यामुळे संबंधित महिलेला रामराजेंनी आर्थिक मदत केल्याचे त्या संभाषणातून दिसून येत आहे. यातील संभाषणावरून हा व्हिडिओ दिवाळीतील असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, गोरे प्रकरणातील महिलेशी बोलतानाचा ऑडिओ व्हायरल झाल्यामुळे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वडुज पोलिसांनी कालच रामराजे नाईक निंबाळकर यांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने निंबाळकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपची ‘सरकारनामा’ पुष्टी करत नाही.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटीची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली होती. तिच्या पाठोपाठ पत्रकार तुषार खरात, शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल सुभेदार यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी वडूज पोलिसांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह १२ जणांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
वडूज पोलिसांकडून समन्स जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच दुसऱ्याच दिवशी संबंधित महिला आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्यात चर्चेला एकच उधाण आले आहे. आता रामराजेंचे पाऊल काय असणार, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये रामराजे हे प्रदीप असे नाव घेत आहेत. तुम्ही इतकं धाडस केलंय. तुम्ही घरीच थांबा, प्रदीप तुमच्याकडे येईल. तुमची थोडी सोय करतो, असे ते म्हणताना दिसून येत आहेत. त्याहून मोठं म्हणजे दिवाळीनंतर कूपमध्ये तुमची सोय करतो, कूपर माझ्या शेजारीच आहे, असेही ते महिलेशी बोलत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मी एका ठिकाणी नोकरीसाठी गेले होते, पण त्याच्या माणसांनी तेथे येऊन सांगितले की, तुम्ही त्या बाईला कामावरून ठेवू नका. संबंधित लोकांनी एका महिन्यात मला कामावरून काढून टाकलं होतं. या प्रकरणात मी संपूर्णपणे डिस्टर्ब झाले आहे. माझे आर्थिक गणित कोलमडले आहे. मी काही ठिकाणी कामं मिळवली होती. पण जयकुमारनी माझ्या विरोधात गुन्हा नोंदवला आणि त्याच्या बातम्या छापून आल्यामुळे माझी कामे गेली. मी हे पैशासाठी करतेय, असा प्रचार त्यांनी सुरू केला. दिवाळी असतानाही मी सध्या मोकळी झाले आहे, असेही संबंधित महिला या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहे.
कुपरमध्ये तुमचं दिवाळीनंतर काम होईल. तुमची सोय होऊन जाईल. पुण्यात माझ्या ओळखीचं एक हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी काम करू शकता, असं रामराजे संबंधित महिलेशी बोलताना म्हणत आहेत. त्यावर मी पुण्यात जायला तयार आहे. साताऱ्यात मला त्याची लोक त्रास देत आहेत, असेही संबंधित महिला बोलताना स्पष्ठपणे ऐकायला येत आहे. हे सांगताना मात्र रामराजेंचे नाव पुढे येऊ नये, असेही ती म्हणत आहे. मात्र, जयकुमार गोरेंनी माझंही नाव घेतलं आहे, असे रामराजे सांगत आहेत. त्यावर त्यांनं घेऊद्यात. पण मी म्हटलं पाहिजे की आपल्या दोघांमध्ये कॉन्टक्ट आहेत. त्यावर रामराजेही ‘त्याला कोण घाबरतंय’ असे म्हणत आहेत.
दरम्यान, वडूज पोलिसांकडून आलेले समन्स आणि व्हायरल ऑडिओ क्लिपचे टायमिंग जुळून आल्याचे दिसून येत आहे. खरं खोटं हे पोलिस तपासात निष्पन्न होईल. मात्र, या ऑडिओ क्लिपमुळे रामराजेंच्या भोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे.