पुरंदर, भोर, दौंड ३ उमेदवारांची माघार ‘खडकवासला’तच प्रतिरूप मतमोजणी: जिल्हा निवडणूक शाखेची माहिती

0

विधानसभा निवडणुकीत मतमोजणीवर हरकत घेतलेल्या बहुतांश उमेदवारांनी माघार घेतल्याने आता केवळ खडकवासला मतदारसंघातच प्रतिरूप मतमोजणी होणार आहे. जिल्हा निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार पुरंदर, भोर व दौंड मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी केलेले अर्ज माघारी घेतले आहेत. तसेच शिरूर मतदारसंघातील उमेदवाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे प्रतिरूप मतमोजणीसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांमधील महाविकास आघाडीच्या ११ पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्राच्या तपासणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे अर्ज केले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ व काँग्रेसच्या ३ उमेदवारांचा समावेश होता. यात बारामतीतील युगेंद्र पवार यांनी माघार घेतल्यानंतर १० अर्ज शिल्लक राहिले होते. आता पुरंदर, भोर व दौंड या तीन मतदारसंघांतील उमेदवारांनीही माघार घेतली आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

उर्वरित सहा मतदारसंघांमधील उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता केवळ खडकवासला मतदारसंघातील उमेदवाराने आपला तपासणी व पडताळणीचा अर्ज कायम ठेवला आहे. न्यायालयात याचिका दाखल केलेल्या अर्जांवर निर्णय न्यायालयाच्या निर्देशांनुसार होणार आहे. तर खडकवासला मतदारसंघातील अर्जावर प्रतिरूप मतमोजणी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा निवडणूक शाखा करणार आहे.

न्यायालयात याचिका दाखल केलेल्या सहा उमेदवारांव्यतिरिक्त आणखी तीन उमेदवारांनी याचिका दाखल केल्या आहेत. त्यांनी मात्र मतमोजणीच्या पडताळणीसाठी अर्ज केलेला नाही. पडताळणीसाठी अर्ज केलेल्या व याचिका दाखल केलेल्यांपैकी शिरूरमधील उमेदवारानेही पडताळणीसाठीचा अर्ज मागे घेतला असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मतमोजणीची पडताळणीसाठीचा अर्ज

– खडकवासला

न्यायालयात अर्ज केलेले उमेदवार

– खेड आळंदी, शिरूर, चिंचवड, पिंपरी, शिवाजीनगर, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, भोसरी