पुण्यातील एमसीए स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यातील टी-ट्वेंटी मालिकेतील चौथा सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाकडून अचानक डेब्यू करणाऱ्या हर्षित राणाने अन् फिरकीपटूंनी इंग्लंडला गुडघ्यावर आणलं. शिवम दुबेच्या जागी कनकशन सब्स्टीट्यूट म्हणून आलेल्या हर्षितने कहर केला. तर हादिक पांड्या आणि शिवम दुबेची हाफ सेंच्युरी टर्निंग पाईंट ठरली.






इंग्लंडचा डाव
टीम इंडियाने दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात चांगली झाली. दोन्ही सलामीवीरांनी पावर प्लेमध्ये अफलातून कामगिरी केली. मात्र, पावर प्लेच्या अखेरच्या बॉलवर विकेट मिळाली अन् टीम इंडियाने सापळे रचण्यास सुरूवात केली. हॅरी ब्रुकने इंग्लंडसाठी दमदार अर्धशतक ठोकलं. पण नेहमीप्रमाणे वरूण चक्रवर्तीने त्याला जाळ्यात अडकवलं. अखेरीस ओव्हरटोन आक्रमक रुप धारण करत असताना हर्षित राणाने त्याला माघारी पाठवलं. अखेरीस इंग्लंडचा संघ 166 धावांवर ऑलआऊट झाला. हर्षित राणाने 4 ओव्हरमध्ये 33 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
पांड्या अन् दुबेने सावरलं
हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावत 181 धावा केल्या आहेत. 12 धावांवर टीम इंडियाने तीन विकेट गमावल्या होत्या. साकिब महमूदने दुसऱ्याच ओव्हरमध्ये संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. रिंकू सिंग आणि अभिषेक शर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 32 चेंडूत 45 धावांची भागीदारी केली.
शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचे लक्ष्य 160 धावांच्या पुढं नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. या सामन्यात दोघांनी 53-53 धावांची अफलातून खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 181 धावा उभारता आल्या.
दरम्यान, 79 वर 5 विकेट्स अशी परिस्थिती असताना हार्दिक आणि शिवम दुबे यांनी सुत्र हातात घेतली अन् दोघांनी आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी मिळून 87 धावांची पार्टनरशीप केली. हार्दिक पांड्याने 30 बॉलमध्ये 4 सिक्स अन् 4 फोरच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने 34 बॉलमध्ये 7 फोर अन् 2 सिक्सच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. दोघांनी मिळून इंग्लंडच्या गोलंदाजांना पाणी पाजलं होतं












