मागील काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. ठाकरे गटाचे काही खासदार फुटून भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. भाजपकडून हे ऑपरेशन राबवलं जात असल्याचं बोललं जातंय.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ऑपरेशन टायगरला हिरवा कंदिल दिल्याचं सांगितलं जातंय. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नऊ पैकी सहा खासदार भाजपात सामील होणार असल्याची चर्चा आहे.






आता सहापैकी पाच खासदार शिंदे गटात जाण्यास पूर्णपणे तयार असून केवळ एका खासदारामुळे पक्षप्रवेशाचं घोडं आडल्याचं बोललं जातंय. शिवसेना ठाकरे गटातचे ९ पैकी ६ खासदार भाजपच्या नेटवर्कमध्ये सेट झाल्याची चर्चा आहे. पाच खासदारांकडून पडद्यामागं पूर्णपणे जुळणी झाल्याची माहिती आहे. पण एका खासदाराचं अद्याप तळ्यात मळ्यात सुरू आहे. पक्षांतर बंदी कायद्यातून वाचायचं असेल तर ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार फुटणं आवश्यक आहे. अन्यथा फुटीर गटावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी ६ खासदारांचा आकडा महत्वाचा आहे.
खरं तर, सुरुवातीला ठाकरेंचे खासदार फुटून शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आता हे सर्व खासदार शिंदे गटाऐवजी भाजपात सामील होणार असल्याचं बोललं जातंय. ठाकरेसेनेच्या खासदारांचं भाजपमध्ये होणाऱ्या संभाव्य पक्ष प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटात मात्र मोठी नाराजी पसरली आहे. ठाकरेंचे सहा खासदार भाजपात सामील झाले तर केंद्रातील एकनाथ शिंदे गटाचं महत्त्व कमी होऊ शकतं. याच कारणामुळे शिंदे गटात नाराजी आहे.
दुसरीकडे पुण्यातले तीन माजी आमदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती आहे. यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, महादेव बाबर आणि चंद्रकांत मोकाटे यांचा समावेश आहे. पुण्यात होणाऱ्या या ऑपरेशन टायगरची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिल्याची चर्चा आहे.












