राज ठाकरेंचा ‘येक नंबर’ कार्यकर्ता; पोलिसांनाही गोंधळात टाकणारा प्रसंग

0
1

धैर्य घोलप आणि सायली पाटील यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘येक नंबर’ हा मराठी चित्रपट थिएटरमध्ये चांगलाच गाजला. आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका कट्टर कार्यकर्त्याच्या निष्ठा, संघर्ष, आणि आत्मशोधाचा प्रवास उलगडणाऱ्या या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या रविवारी 26 जानेवारी रोजी झी टॉकीजवर दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. हा चित्रपट प्रताप नावाच्या कार्यकर्त्याची गोष्ट सांगतो, जो राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला आहे. प्रताप अचानक आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे स्वतःच्या निष्ठांवर प्रश्न विचारू लागतो आणि सत्याचा शोध घेतो.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

एका दृश्यात प्रताप दारूच्या नशेत राज ठाकरे यांच्या पोस्टरवर शिव्या घालत रस्त्यावर गोंधळ घालतो. कॅमेरा लांब ठेवून शूटिंग केल्यामुळे चित्रपटातील हा सीन खराच वाटतो. पण शूटिंगदरम्यान खऱ्या पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या प्रतापला रोखण्यासाठी हस्तक्षेप केला. काही वेळाने त्यांना हे शूटिंग असल्याचं कळलं. सत्य समजल्यानंतर पोलिसांनी धैर्य घोलपच्या अभिनयाचं कौतुक करत म्हटलं, “तुझा अभिनय खरंच येक नंबर आहे.”

राजेश मापुस्करने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. प्रेम आणि राजकीय महत्त्वाकांक्षेचं कथानक असलेल्या या चित्रपटात धैर्य घोलप आणि सायली पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. झी स्टुडिओज, नाडियादवाला ग्रँडसन्स एंटरटेनमेंट आणि सह्याद्री फिल्म्स या बॅनरअंतर्गत तेजस्विनी पंडित आणि वरदा नाडियादवाला यांची ही निर्मिती असून ‘येक नंबर’मध्ये रोमान्स, नाट्य, राजकीय उत्कंठावर्धक घडामोडी आणि थरार यांची सांगड घातलेली आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

‘येक नंबर’ या चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारं आहे. यात राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रेम आणि राजकारणाचं नाट्य गुंफलेलं आहे. या चित्रपटात ग्रामीण भागातील रांगडेपणा आणि शहरातील आव्हानं यांची सांगड घालण्यात आली आहे. प्रेम, महत्त्वाकांक्षा, राजकीय विचारधारा या भावनांचा शोध त्यात घेण्यात आला आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट मनोरंजन करण्यासोबतच विचार करायलाही भाग पाडतो.