शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, अर्थात एआय इन अॅग्रीकल्चर हा प्रयोग बारामतीमध्ये राबवला जात आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रयोगाची दखल मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रमुख सत्या नाडेला यांनी घेतलेली आहे. ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार हे एआय इन ॲग्रीकल्चर या प्रकल्पाचे प्रणेते आहेत. शेती आणि कृत्रिम बुद्धिमता (एआय) याच विषयावर प्रतापराव पवार यांनी भाष्य केलं.






शेती आणि कृत्रिम बुद्धिमता यावर भाष्य करताना ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार म्हणाले, ‘सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टची माणसं बारामतीत प्रयोग सुरू असलेल्या कृषी विज्ञान केंद्रात पाठवली आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे देखील त्यांच्या लोकांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी या प्रयोगाची दखल घेतलेली आहे. त्यामुळे देशासाठी, शेतकऱ्यांसाठी, बारामतीसाठी हा मोठा आनंदाचा आणि विजयाचा दिवस आहे. सत्या नाडेला यांच्यामुळे यात काम करणाऱ्यांचा उत्साह वाढणार आहे. त्यांना प्रेरणा मिळणार आहे’.
https://x.com/Microsoft/status/1877044480227914208
‘शेतीतील हरितक्रांती, श्वेत क्रांती यांच्यानंतर ही आता तिसरी क्रांती असणार आहे. ती एआय क्रांती असेल. एआय म्हणजे सीएनसी मशीनसारखे आहे. एकदा ते सेट केले की, तुम्हाला काही करावे लागत नाही. ते मशीनच सर्व काही करत असते. गरीब आणि सामान्य शेतकऱ्याला परवडणारे हे तंत्रज्ञान आहे, ही यातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. यात जास्त शेती असावी, जास्त पाणी असावं, जास्त पैसे असावेत अशी कोणतीही अट नाही, असे पवार यांनी सांगितले.
‘शेतीतील एआय तंत्रज्ञान म्हणजे बहुगुणी आखूडशिंगी गाय आहे. सध्या दीडशे शेतकऱ्यांच्या दीडशे एकर क्षेत्रावर एआय तंत्रज्ञानातून ऊस लागवडीचा प्रयोग राबवण्यात आलेला आहे. त्याचे रिझल्ट आश्चर्यकारक आहेत. सरकारला जर या प्रयोगात सहभाग घ्यायचा असेल तर सरकारने गावागावात वेधशाळा उभारून द्यावी त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. राज्यात ऊस पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे सध्या या प्रयोगासाठी ऊस पिकाची निवड केली आहे. एआयइन अॅग्रीकल्चर आपल्या शेतात राबवण्यासाठी पुढील वर्षीसाठी दहा हजार शेतकरी तयार आहेत, असे प्रतापराव पवार यांनी सांगितले.











