शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न, ‘ती’ बातमी आणि अजित पवार भडकले, त्यांचा बंदोबस्तच करतो…

0
1

माझ्या भाषणात कधी शेतकरी कर्जमाफीचा विषय ऐकला का? अशी विचारणा करीत अंथरूण पाहून पाय पसरावेत, असे वक्तव्य अजित पवार यांनी करीत एकप्रकारे कर्जमाफीला विरोध असल्याचे संकेत दिले होते. मात्र आता त्यांनी आपल्या भूमिकेवरून युटर्न घेत माध्यमांनी चुकीची बातमी चालवली असे सांगत संताप व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर गुलियन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस), एसटी भाडे वाढ,शेतकरी कर्जमाफी अशा विविध विषयावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शेतकरी कर्जमाफीला आपला विरोध आहे का?

शेतकरी कर्जमाफीला आपला विरोध आहे का? असे अजित पवार यांना विचारले असता त्यांनी संताप व्यक्त केला. तुमच्यापैकी एका माध्यमाने माझा शेतकरी कर्जमाफीला विरोध असल्याची चुकीची बातमी दिली. मी पण एक शेतकरी आहे. मलाही काही गोष्टी कळतात. सूत्रांच्या आधारे कुणीतरी बातमी दिली. सूत्रांच्या नावाने कशाला खपवता? मी बोललो तर अजित पवार म्हणाले अशी बातमी लावा ना सरळ… माझ्या हाताला सूत्र लागू द्या.त्या सूत्रांचा मी पूर्ण बंदोबस्त करतो मी… अशी फटकेबाजी अजित पवार यांनी केली.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

सूत्रांना जीवनगौरव देण्यात यावा

परवाही एका पत्रकारांच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना सूत्रांना जीवनगौरव देण्याची कल्पना मी मांडली, असे मिश्किलपणेही अजित पवार म्हणाले. जिकडे जिकडे सरकारकडून शेतकऱ्याला मदत होईल, अशी पावले आम्ही टाकत असतो. महायुती सरकारचेही तसे प्रयत्न असतात, असे अजित पवार म्हणाले.

‘त्या’ वृत्तावर अजित पवार भडकले

राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे कर्जमाफीला विरोध असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी खासगीत केल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले गेले. या वृत्तावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

अजित पवार शेतकरी कर्जमाफीवर नेमके काय म्हणाले होते?

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

शेतकरी कर्जमाफीचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नसल्याचेच अजित पवार यांनी एकप्रकारे पुण्यातील दौंडमध्ये बोलताना सांगितले होते. माझ्या भाषणात कधी कर्जमाफीचा विषय ऐकला का? अशी विचारणा करीत अंथरूण पाहून पाय पसरावेत, असा उलट सल्ला प्रश्न विचारणाऱ्या एका नागरिकाला त्यांनी दिला.