घरोघरीच्या लँडलाइनला ‘नवसंजीवनी’; टीसीएस सीडॉट कंपन्या करारबद्ध; स्मार्ट टीव्ही वायफाय मोबाईल एकत्र चालणार

0

एकेकाळी शहरात बीएसएनएलच्या लँडलाइन फोनची चलती होती. शहरात तब्बल सात लाख ग्राहक होते. मात्र, स्मार्ट फोन येताच त्याला घरघर लागली अन् संंख्या कमी होत 40 हजारांवर आली. मात्र, हाच लँडलाइन आता नव्या रूपाने समोर येत आहे. कॉलिंगसह त्यातूनच ब्रॉडबँड अन् वायफाय सुविधा मिळणार आहे.

शहरात 1994 ते 95 च्या सुमारास मोबाईल वापरण्यास सुरुवात झाली. तोवर सामान्य ग्राहकांची लँडलाइनवर भिस्त होती. कारण, मोबाईलचे इनकमिंग, आउटगोइंगचे दर खूप जास्त होते, जे सामान्य ग्राहकाला परवडणारे नव्हते. मात्र, 2001 नंतर मोबाईलने क्रांती केली. कॉलिंगचे दर ग्राहकांच्या थोड्या आवाक्यात आले. त्यामुळे पेजर नावाचे तंत्रज्ञान बाजारात येताच बंद पडले.

तोवर शहरात तब्बल 7 लाख लँडलाइन फोन होते. बीएसएनएलच्या कार्यालयात ग्राहकांचा सतत राबता असे. मात्र, हे चित्र 2010 नंतर पूर्णच बदलले. 2012 ते 2014 या दोनच वर्षांत स्मार्ट फोनमुळे लँडलाइन फोन वापरणार्‍यांची संख्या खूपच रोडावली. घराघरांत फक्त केबलसाठी सोडलेली जागा आता दिसते. हजारो लोकांनी ते कनेक्शन बंद केले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

लँडलाइनच्या वायफायवर मोबाईल चालणार

बीएसएनएलने आता अशी यंत्रणा विकसित केली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा पूर्वीचा साधा फोन घरात वेगळ्या पद्धतीने वापरता येईल. घरात स्मार्ट टीव्ही असेल, तर तोसुद्धा या नव्या प्रकारच्या लँडलाइनवर चालणार आहे. त्यातील वायफाय मोबाईलशी जोडले जाईल. त्यामुळे मोबाईलला या फोनच्या जोडणीची गरज पडेल.

शहरातील टॉवरची संख्या वाढविणार

अस्सल देशी तंत्रज्ञान वापरून थ्रीजी आणि फोरजी ही सेवा बीएसएनएल देत आहे. टीसीएस आणि सीडॉट या दोन कंपन्या हे काम करत असून, सरकारी ब्रॉडबँड विकसित होत आहे. सध्या शहरात 870 टॉवर असून, आणखी 200 टॉवर शहरात, तर 93 टॉवर पुणे ग्रामीणमध्ये बसवले जाणार आहेत. त्यामुळे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी शहरासह ग्रामीण भागात वाढविण्यावर बीएसएनएलचा भर राहणार आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

ग्रामीण भागात डिजिटल क्रांतीसाठी पुढाकार

शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बीएसएनएलने 4 जी सेवा देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 93 नवे टॉवर उभारण्यात येणार आहेत. यात तीन कंपन्या एकत्र आल्या आहेत. बीएसएनएल, एअरटेल आणि रिलायन्स जिओ या कंपन्या सरकारने एकत्र आणत ग्रामीण भागासाठी ब्रॉडबँड सेवा देणार आहे.

यापूर्वी ज्या कंपनीचा टॉवर त्याच कंपनीचा मोबाईल ग्रामीण भागात वापरावा लागत असे. मात्र, आता ग्राहकांना तीन कंपन्यांचा विकल्प राहणार आहे. या टॉवरला सबसिडी टॉवर असे नाव देण्यात आले आहे. मिशन 2.0 (टू पॉइँट झिरो) अंतर्गत ग्रामीण भागात डिजिटल क्रांती आणण्याची तयारी सुरू आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

– शामुवेल भातंब्रे, प्रधान सरव्यवस्थापक लँडलाइन

फोनमधील तांब्याची चिप काढून ती यंत्रणा फायबर सोबत जोडली जाईल. त्याला मोडेम कनेक्ट केले जाईल. त्यामुळे इंटरनेटसह वायफाय आणि व्हॉइस कॉलिंग त्यावर सुरू राहील. हेच वायफाय मोबाईलसोबत जोडता येईल. त्यामुळे पुन्हा एकदा लँडलाइन फोनला चांगले दिवस येतील, अशी आशा वाटते. सध्या पंधरा हजार नव्या जोडण्या झाल्यामुळे शहरातील या फोनची संख्या आता 55 हजार इतकी झाली आहे.