आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा कारभारी कोण असणार याबाबतच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांनी भाजपचे नेतृत्व केलं होतं. त्यानंतर आगामी निवडणुकीत पुणे भाजपचे नेतृत्व खासदार मुरलीधर मोहोळ करणार, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील करणार की राज्यमंत्री माधुरी मिसाळ करणार, यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चाचे खल सुरू आहे.






आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत बैठका घेत विकास कामांचा आढावा घेतला . या बैठकीला राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ या अनुपस्थित होत्या. त्यानंतर लगेचच काही दिवसात माधुरी मिसाळ यांनी देखील महापालिकेत स्वतंत्र बैठक घेतली.
भाजपच्या BJP नेत्यांनी वेगवेगळ्या दोन बैठका घेतल्याने पुण्याचे कारभारी कोण होणार यावरून भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे का? सवाल उपस्थित करण्यात येत होता त्यावर मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिले आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुरलीधर मोहळ म्हणाले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या योजनांमुळे देशातील किमान पन्नास टक्के लाभार्थी झालेत. आज ही 65 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात आले आहे. यानिमित्ताने अधिकृत मालमत्ता पत्रक या सर्वांना मिळाले आहे. त्यामुळे प्रॉपर्टी धारकांना यावर आता कोणत्याही बँकेचे कर्ज उपलब्ध होणार असून स्वामित्व योजनेची ही मोठी उपलब्धी आहे,”
”गेल्या आठवड्यात एकूण 33 विमानतळ संदर्भात बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. 2029 पर्यंत पुरंदरचे विमानतळ पूर्ण करण्याचं उद्दिष्ट यात राखण्यात आलेलं आहे. विमानतळ बांधायचा असेल तर जागा राज्य सरकार देते, त्या अनुषंगाने पुरंदर विमानतळसाठी राज्य सरकार जागा देईल.
त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत. तसेच पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच विस्तारी करण करण्यात येणार आहे. आधी तातडीने भू संपादन होईल. राज्य सरकार, पुणे पालिका, पिंपरी पालिका आणि जिल्हा प्रशासन यासाठी निधी उपलब्ध करून देईल असं,” असेही मोहोळ म्हणाले.
पुणे शहराचा पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढवून देण्यास जलसंपदा विभागाने नकार दिला आहे. यावर मोहोळ म्हणाले ,आधीची लोकसंख्या आणि सध्याची लोकसंख्या किती याचा विचार करायला हवा. जलसंपदा विभागाने आपण किती पाणी उचलतोय, याचा विचार जलसंपदा विभागानेही करायला हवा. आम्ही वापरलेलं पाणी प्रक्रिया करून सोडतोय, जलसंपदा विभाग त्याचा किती वापर करतोय, हे त्यांनी तपासावे. त्यानंतर पाण्याबाबत निर्णय घ्यावा.
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पुण्याचा कारभारी कोण असणार अस विचारलं असता मोहोळ म्हणाले, भाजपा मध्ये कोणी एक व्यक्ती नेतृत्व करत नाही. त्यामुळे पुण्यात सामूहिक नेतृत्व केलं जातंय. अगदी राज्यात अन देशात ही तसंच आहे. असं म्हणत आगामी महापालिका निवडणुकीत सामूहिक नेतृत्व असेल असे संकेत मोहोळ यांनी दिले.











