राज्यातील या चार जिल्ह्यांत होणार सोलर पार्क; एक हजार ३५२ मेगावॉट होणार ऊर्जानिर्मिती

0

एसजेव्हीएन ग्रीन एनर्जी राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये तब्बल १,३५२ मेगावॉटचे सोलर पार्क उभारणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत दोन ते दहा मेगावॉट क्षमतेचे १०२ सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प असणार आहेत. ग्रीडने जोडलेल्या या प्रकल्पांमध्ये तयार होणारी वीज शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पुरवली जाणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, म्हणून ग्रामीण भागात सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कमी क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. तेथे तयार होणारी वीज महावितरणच्या वीज उपकेंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरविली जाणार आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

त्यानुसार एसजेव्हीएन ग्रीन एनर्जीकडून राज्यात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, त्याची देखभाल-दुरुस्ती आणि संचलनासाठी निविदा काढल्या आहेत. या प्रकल्पातून पुढील २५ वर्षे वीजपुरवठा होऊ शकणार आहे. सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत उभारल्या जाणाऱ्या सौर प्रकल्पांमुळे सध्या वीज केंद्रांवर येत असलेला भार कमी होणार आहे.

येथे होणार प्रकल्प?

पुणे : ९ ठिकाणी एकूण १५४ मेगावॉट

नाशिक : २२ ठिकाणी ३०४ मेगावॉट

छ. संभाजीनगर : १९ ठिकाणी ३१५ मेगावॉट

सोलापूर : ५२ ठिकाणी ५७९ मेगावॉट