मागच्या आठवड्याभरापासून अज्ञातवासात गेलेले अजित पवार रविवारी समोर आले. सोमवारी त्यांनी लोकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. संतोष देशमुख खून प्रकरण, छगन भुजबळांची नाराजी; या विषयांवर अजित पवारांची बाजू पुढे आलेली नाही.त्यातच आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
सोमवारी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेऊन तासभर चर्चा केली. परंतु या चर्चेमध्ये संतोष देशमुख खून प्रकरण, राजीनामा प्रकरण यावर दोघांमध्ये काहीही चर्चा झाली नाही, असं धनंजय मुंडेंनी बाहेर येऊन सांगितलं. अजित पवारांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन माझ्या खात्याबद्दल माहिती दिल्याचं धनंजय मुंडे सांगतात.
अजित पवार-धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर आता अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. प्रमुख मराठी वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त दिले आहे. ही भेट आजच (सोमवारी) रात्री होणार असल्याची माहिती आहे. या भेटीमध्ये संतोष देशमुख खून प्रकरण आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल चर्चा होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली होती. तसेच जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, संभाजीराजे छत्रपती, अंबादास दानवे यांनीही राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आधी सरकार दरबारी मागणी केल्यानंतर या सर्वांनी सोमवारी राज्यपालांची भेट घेतली. धनंजय मुंडे सरकारमध्ये असतील तर तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपास निःपक्षपणे होणार नाही, असा विरोधकांना संशय आहे.
विशेष म्हणजे आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतलं आहे. दोन कोटींच्या खंडणीची डील धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर सातपुडा येथे झाली, असं धसांचं म्हणणं आहे. त्यामुळे मुंडेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसतंय. दुसरीडे खंडणी प्रकरणी एसआयटीच्या कोठडीत असलेला वाल्मिक कराड खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होईल, असा विश्वास सुरेश धस यांना आहे.