विधानसभेतील यशानंतर भाजपने राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी बैठकांचा धडाका लावला असून इतर राजकीय पक्षही निवडणुकीसाठी सरसावले आहेत. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंबई, नागपूर येथे बैठका घेत कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. या सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी शिर्डी येथे १२ जानेवारीला बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. तर महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसीय चिंतन शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर १८ व १९ जानेवारीस होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत बैठकीचा धडाका लावला आहे. तसेच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे राज्यभर दौरे करून आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ८ व ९ जानेवारीस बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपचे मुंबईवर ‘लक्ष्य’
मुंबई महापालिकेवर आठ मार्च २०२२ रोजी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. या घटनेला जवळपास तीन वर्षे पूर्ण होत आहेत. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पालकमंत्रिपद आल्यानंतर त्यांनी मुंबई महापालिकेत तळ ठोकून भाजपचा वरचष्मा कसा राहील, असा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते. आता केंद्रीय मंत्र्यांकडून देखील निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारची निवडणुकीसाठी तयारी
महायुतीची सत्ता आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर रिक्त असणाऱ्या आयोगाच्या आयुक्तपदासाठी ‘मर्जीतील’ निवृत्त सनदी अधिकाऱ्याचा शोध सुरू झाला आहे.