बीडमध्ये मोर्चा, राजीनाम्याची मागणी, धनंजय मुंडेंनी अखेर मौन सोडलं म्हणाले; मी बोलेन पण फक्तं यासाठी शांत…!

0

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहेत, यानंतर वाल्मिक कराड फरार आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी शनिवारी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला, या मोर्चाला सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या सगळ्या वादावर अखेर धनंजय मुंडेंनी मौन सोडलं आहे. योग्य वेळ आल्यावर मी बोलेन, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. मुंबईच्या वाळकेश्वर येथील श्री प्रसन्न वीर हनुमान मंदिर येथे दर्शनासाठी धनंजय मुंडे आले होते. मी दर शनिवारी दर्शनासाठी या मंदिरामध्ये येतो, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

वाल्मिक कराडच्या पत्नी-बॉडीगार्डची चौकशी

दरम्यान शुक्रवारी सीआयडीने वाल्मिक कराडची पत्नी आणि त्याच्या दोन बॉडीगार्डची चौकशी केली. वाल्मिक कराडच्या पत्नीबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना लातूरमधून चौकशीसाठी बीड शहर पोलीस स्टेशनला आणलं गेलं होतं. वाल्मिक कराड या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पोलिसांनी वाल्मिक कराडवर केवळ खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वाल्मिक कराड हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे मानले जातात. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनीही ते नाकारलं नाही. पण या प्रकरणी जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप आहे. तर मुंडेंशी असलेल्या जवळीकीमुळे कराडवर पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेजण फरार आहेत. इकडं खंडणी प्रकरणी पोलिसांनी खंडणी विष्णू चाटेला अटक केली आहे. तर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेंचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.