इंदापूरच्या द्राक्षांची परदेशात गोडी वाढतेय; निर्यातक्षम उत्पादकांची संख्यावाढ ४०० हेक्टरची निर्यातीसाठी नोंदणी

0

इंदापूर तालुक्यातील द्राक्षाची परदेशातील ग्राहकांना चांगलीच भुरळ पडली आहे. तालुक्यातून जंबो द्राक्षाची निर्यात होत असून, यंदा निर्यातदार शेतकऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चीन, दुबई, मलेशिया, थायलंड यांसारख्या देशात येथील द्राक्षाची सर्वाधिक निर्यात होत आहे. परदेशातील ग्राहकांना इंदापूरच्या द्राक्षाच्या गोडीने मोहित केले आहे.

गतवर्षी तालुक्यातून सुमारे चार हजार मेट्रीक टनांहून अधिक द्राक्ष परदेशात पाठविण्यात आली. तर यंदा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत ३२५ शेतकऱ्यांनी ४०० हेक्टर क्षेत्राची कृषी विभागाकडे निर्यातीसाठी द्राक्ष नोंदणी केली आहे.

यामुळे यंदा दुपटीने म्हणजे सुमारे आठ हजार मेट्रीक टन द्राक्ष परदेशात निर्यात होणे अपेक्षित असून, यातून कोट्यवधीची उलाढाल होणार आहे. यामुळे वर्षभर तळहातावरील फोडाप्रमाणे बाग सांभाळलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य दाम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

इंदापूर तालुक्यात सुमारे २४५० हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. तालुक्याचा पश्चिम पट्टा द्राक्षाचे आगार म्हणून ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे पीक घेतले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने एसएसएन, सुपर सोनाक्का, माणिक चमन, नारायणगांव जम्बो, कृष्णा सिडलेस, नानासाहेब पर्पल, आर. के. या वाणाच्या द्राक्षाचे मोठे क्षेत्र आहे.

येथे पिकणारी जम्बो द्राक्ष स्थानिक बाजारपेठेबरोबर परदेशातील ग्राहकांच्या पसंतीस उतरली असल्याचे द्राक्ष उत्पादक सांगतात. सध्या द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षाचे उत्पादन कमी मिळणार आहे. द्राक्ष बागांच्या खरड छाटणीनंतर बदललेल्या वातावरणाचा परिणाम घड निर्माण होण्यावर झाला आहे.

अधिक वाचा  पुणे भाजपच्या दुटप्पी भूमिकेने शिवसेनेपुढे प्रश्नचिन्ह?; पदरात तोकड्याच जागा अन् त्याही एकदम कडक पाषाण

यामुळे यंदा बागांमध्ये द्राक्ष मालाचे प्रमाण घटले आहे. सुमारे ४० टक्के द्राक्षाचे उत्पादन घटल्याचे द्राक्ष उत्पादक सांगत आहेत. बिरंगुडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सोमनाथ सांगळे म्हणाले, ”माझ्याकडे नऊ एकर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड आहे. यामध्ये एसएसएन, सुपर सोनाक्का, माणिक चमन, नारायणगांव जम्बो, कृष्णा सिडलेस या वाणांची द्राक्ष आहे.

यापैकी एसएसएन व्हरायटीची सुमारे एक एकर द्राक्ष बाग आहे. यामधील सात टन द्राक्ष व्यापाऱ्यातर्फे दुबईच्या मार्केटमध्ये पाठविण्यात आली. आम्हाला प्रतिकिलो १११ रुपये दर मिळाला. आणखी तीन ते चार टन द्राक्ष बागेत शिल्लक आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे तोडणी थांबली आहे.’

येथील द्राक्ष बागायतदार संघाचे सचिव गणेश सांगळे म्हणाले, ”यंदा द्राक्ष उत्पादन घटले आहे. काहींच्या बागा पूर्णपणे फेल गेल्या आहेत. मात्र, ज्यांनी बागा चांगल्या जोपासल्या आहेत, त्यांचे द्राक्षाचे चांगले पैसे होणार आहेत. सध्या तोडणीस आलेली दर्जेदार द्राक्ष व्यापाऱ्यांकरवी परदेशात पाठविली जात आहेत. या द्राक्षाला प्रतिकिलो शंभर रुपयांहून अधिकचा दर मिळत आहे. माल कमी असला तरी पैसे चांगले होतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

ढगाळ वातावरणामुळे उत्पादक चिंतेत

सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता आहे. ज्यांच्या द्राक्ष घडात पाणी उतरले आहे, त्यांना पावसाची चिंता भेडसावत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास द्राक्ष मणी क्रॅक होतील, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. यंदा द्राक्षाचे उत्पादन कमी असून, अवकाळीने फटका दिल्यास होणारे नुकसान सोसणारे नसेल, अशी प्रतिक्रिया द्राक्ष उत्पादक व्यक्त करत आहेत.