लोकसभेत चर्चा सुरू असतानाच संरक्षण दलांना मोठं यश; पहलगाम हल्ल्यातील लष्कर कमांडर मुसासह 3 दहशतवादी ठार, Army नं बदला घेतला?

0

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन महादेव’मध्ये मोठं यश मिळालं आहे. श्रीनगरजवळील दाचीगाम भागातील लिडवास येथे झालेल्या चकमकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मुसासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

ड्रोनच्या मदतीने मृतदेहांची ओळख

अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी, ड्रोन सर्व्हेलन्समध्ये तीनही दहशतवाद्यांचे मृतदेह दिसल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

दहशतवाद्यांकडून अचानक गोळीबार, लष्कराचे प्रत्युत्तर

मुलनार परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. या दरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकांनी प्रतिकार करत तिन्ही दहशतवाद्यांना ठार केले.

अधिक वाचा  पुण्यात भाजपा मित्र पक्षाला मोठा धक्का; भाजपलाही धक्कादायक प्रवेशामुळे ही नवी भिती! एकावेळी २०० कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा

लष्कराची अधिकृत घोषणा

भारतीय लष्कराच्या १५ व्या कॉर्प्स रेजिमेंट चिनार कॉर्प्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या ऑपरेशनची माहिती देत यशस्वी कारवाईची पुष्टी केली.

२२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यात नेमकं घडलं काय?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरातील बैसरन पर्वतावरील कुरणावर २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या भ्याड हल्ल्यात २५ भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. गेल्या काही वर्षांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. या हल्ल्यानंतर जगभरातून भारताच्या पाठीशी उभं राहत दहशतवादाचा निषेध करण्यात आला. सोशल मीडियावरही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

अधिक वाचा  संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता! लोकसभेत १५ बैठका, ९२ तास काम, १० विधेयके ८ मंजूरचे कामकाज

भारताची प्रत्युत्तर कारवाई – ऑपरेशन सिंदूर

हल्ल्यानंतर भारताने मोठी मोहीम राबवत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं. या कारवाईत पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या नऊ तळांचा नाश करण्यात आला. या कारवाईनंतर दहशतवाद्यांच्या हालचालींवर मोठं आव्हान उभं राहिलं.

आता ‘ऑपरेशन महादेव’मध्ये खात्मा

नुकत्याच झालेल्या ऑपरेशन महादेवमध्ये, या हल्ल्यामागे असलेल्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मुसाचाही समावेश असल्याचं सुरक्षा दलांनी जाहीर केलं आहे.