मुंबई दि. २४ (रामदास धो. गमरे) भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लोकसभेत भर सभागृहात अनुद्गार काढणाऱ्या देशाचे विद्यमान गृहमंत्री अमित शाह यांचा माफीनामा घेऊन त्यांना तत्काळ गृहमंत्री पदावरून पदच्युत करावे असे निवेदन पत्र भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी महामहिम राष्ट्रपतींकडे सादर केले आहे.
अखिल विश्वात भारत प्रजासत्ताक देशाचे संविधान हे सर्वोच्च मानले जाते त्याच संविधानाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लोकसभेत दोन्ही पक्षात व्यापक चर्चा सुरू असताना सर्वांनी लोकसभेची प्रतिष्ठा व शिष्टाईचे भान ठेवून आपापली मते मांडली परंतु विद्यमान गृहमंत्री अमित शाह यांनी जाणूनबुजून हेतुपुरस्सर भावनेने “आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर कहना तो जैसे आजकल फैशन बन गया है, इतनी बार अगर ईश्वर का नाम लिया होता तो ईश्वर स्वयं मिल जाते” असे तिरस्कारपूर्ण अनुद्गार काढून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला त्यामुळे देशातील संविधानप्रेमी नागरिक व अखिल विश्वातील आंबेडकरी विचारधारेच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून गृहमंत्री अमित शाह यांचा माफीनामा घेऊन त्यांना तत्काळ गृहमंत्री पदावरून पदच्युत करण्यात यावे अन्यथा देशविदेशातील अब्जावधी आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरून अमित शाह यांचा निषेध करतील अशी सूचनावजा निवेदन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी महामहिम राष्ट्रपतींकडे सादर केले आहे.